उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, पंतप्रधानांची भेट घेणार, सोनिया गांधींसोबतही चर्चा

| Updated on: Feb 21, 2020 | 9:12 AM

नोव्हेंबर महिन्यात पुणे विमानतळावर पंतप्रधानांच्या स्वागतासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांची अवघ्या काही मिनिटांची ओझरती भेट झाली होती.

उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, पंतप्रधानांची भेट घेणार, सोनिया गांधींसोबतही चर्चा
Follow us on

नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी या दोन्ही दिग्गज नेत्यांची स्वतंत्र भेट घेणार आहेत. दोन्ही भेटींमध्ये नेमकं काय घडणार, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचंही लक्ष (Uddhav Thackeray to meet PM Narendra Modi) लागलं आहे.

नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी संध्याकाळी 5.30 वाजता उद्धव ठाकरे दाखल होतील. तर सहा वाजता सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे भेटीला जातील. त्यानंतर साडेसात वाजता भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट उद्धव ठाकरे घेतील.

मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच राजधानीत निघाले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यातही नरेंद्र मोदींना सामोर गेले होते. पुणे विमानतळावर पंतप्रधानांच्या स्वागतासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांची अवघ्या काही मिनिटांची ओझरती भेट झाली होती. मात्र आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या नियोजित भेटीत काय होणार, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

ही सदिच्छा भेट असल्याचं सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राजकीय रंग न देण्याचं आवाहन ट्विटरवरुन केलं होतं. परंतु शिवसेना-भाजप युतीमध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची पहिल्यांदाच चर्चा होणार आहे. अशा वेळी उद्धव ठाकरेंना ‘छोटे भाऊ’ म्हणणारे नरेंद्र मोदी त्यांचा पाहुणचार कसा करतात, याकडे सर्वांचे डोळे आहेत.

उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा

सात मार्चला उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. या दौर्‍यात ते रामलल्लांचं दर्शन घेऊन शरयू नदीच्या काठावर आरती करतील. अयोध्येत राम मंदिराला शिवसेनेचा पाठिंबा आहे. केंद्र सरकारनेही ट्रस्टची स्थापना करुन मंदिर बांधणीचा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे अयोध्या दौऱ्याविषयी उद्धव ठाकरे आणि मोदींची चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सीएए-एनआरसी आणि एनपीआर

महाराष्ट्रात सीएए, एनआरसी आणि एनपीआरबाबतही तणावाचं वातावरण आहे. एकीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेस उघडपणे सीएए, एनआरसी आणि एनपीआरला विरोध करत आहेत, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात एनपीआर अंतर्गत जनगणनेची अधिसूचना जारी केली आहे.

इतकंच नाही, तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंचं मत वैयक्तिक असल्याचं सांगितलं. आपला पक्ष सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या पूर्णपणे विरोधात असल्याचाही पुनरुच्चार त्यांनी केला. (Uddhav Thackeray to meet PM Narendra Modi)