मेरठचं नाव नथूराम गोडसे नगर करणार, हिंदू महासभेच्या घोषणेनी पुन्हा खळबळ!

मंगळवारी हिंदू महासभेने निवडणुकीसाठीचा जाहीरनामा सादर केला

मेरठचं नाव नथूराम गोडसे नगर करणार, हिंदू महासभेच्या घोषणेनी पुन्हा खळबळ!
Image Credit source: social media
| Updated on: Nov 23, 2022 | 10:49 AM

मेरठः उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मेरठ येथे हिंदू महासभेने (Hindu Mahasabha) वादग्रस्त घोषणा केली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या कऱणाऱ्या नथूराम गोडसे याचं नाव मेरठला (Meerut) दिलं जाईल, अशी घोषणा हिंदू महासभेतर्फे करण्यात आली. मेरठ येथे लवकरच महापालिका निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर हिंदू महासभेने रणशिंग फुंकलं.

मंगळवारी हिंदू महासभेने निवडणुकीसाठीचा जाहीरनामा सादर केला. मेरठ नगरपालिकेची निवडणूक जिंकलो तर सर्वात पहिल्यांदा मेरठचं नाव बदलून नथूराम गोडसे नगर ठेवलं जाईल, अशी घोषणा करण्यात आली.

हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पंडित अशोक शर्मा आणि प्रेस प्रवक्ते अभिषेक अग्रवाल म्हणाले, हिंदू महासभा मेरठ नगरपालिका निवडणूक लढवणार आहे. महापौर, आमदार, नगरसेवक सर्वच ठिकाणी हिंदू महासभेचे उमेदवार उभे राहतील.

मेरठमध्ये हिंदू महासभा विजयी झाली तर जिल्ह्याचं नाव नथूराम गोडसे नगर केलं जाईल. तसेच शहरातील विविध ठिकाणांची नावं बदलून हिंदू महापुरुषांच्या नावाने केली जातील, अशी घोषणा या नेत्याने केली.

मेरठमधील हिंदू महासभेच्या कार्यालयात महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथूराम गोडसे यांचे मंदिर बांधण्यात आले आहे. इथे नारायण आपटे यांचीही मूर्ती आहे. लोक येथे दररोज त्यांची पूजा करतात.

महाराष्ट्रात राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा वाद काही प्रमाणात शमला आहे. भारत जोडो यात्रेनिमित्त महाराष्ट्रात आलेल्या राहुल गांधी यांनी हिंगोली, वाशिम, अकोल्यात वादग्रस्त वक्तव्ये केली. सावरकर हे ब्रिटिशांची पेंशन घेत होते, या राहुल गांधींच्या वक्तव्याने भाजप, मनसे आक्रमक झाली. तसेच शिवसेनेनेही महाविकास आघाडीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांना इशारा दिला. त्यानंतर आता मेरठ येथील हिंदू महासभेच्या भूमिकेनंतर आता हे वादग्रस्त वक्तव्य पुढे आले आहे.