डिलिमिटेशनवरुन रोहित पवारांचा पक्षाला मोठा धक्का, थेट सुप्रिया सुळे यांनाच पत्र, घरचा आहेर देत..
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सुप्रिया सुळेंना भावनिक पत्र लिहिले आहे. या पत्रामधून रोहित पवार यांनी डिलिमिटेशवर घेतलेल्या भूमिकेवरुन रोखठोक भूमिका मांडली आहे.

Rohit Pawar Letter To Supriya Sule: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सुप्रिया सुळेंना भावनिक पत्र लिहिले आहे. या पत्रामधून रोहित पवार यांनी डिलिमिटेशवर घेतलेल्या भूमिकेवरुन रोखठोक भूमिका मांडली आहे. “आज हे पत्र लिहिताना मनात प्रचंड अस्वस्थता आणि वेदना आहे. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळं कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत. साहेबांच्या या अवस्थेनं आपल्या सर्वांच्याच मनात काहूर माजलंय, पण ते लवकरच ठणठणीत बरे होतील, असा विश्वास देखील आहे. पण अशा कठीण प्रसंगी, सध्या ‘डिलिमिटेशन’ (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत सुरु असलेल्या चर्चामुळं राज्यातील पुरोगामी विचारांना मानणाऱ्या जनतेला मोठा धक्का बसलाय, असं रोहित पवार यांनी या पत्रामध्ये म्हटलं आहे.
काय म्हणालेत रोहित पवार?
संघराज्य पद्धतीला तडा देणाऱ्या आणि २०११ साली झालेल्या १५ वर्षे जुन्या जनगणनेच्या आधारावरील या विधेयकामुळं अनुसूचित जाती-जमातींना (SC/ST) त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा मिळणार नाहीत आणि हा अन्याय त्यांना पुढील २५ वर्षे सहन करावा लागेल, वास्तविक नवीन जनगणनेच्या आधारे जातनिहाय खरे आकडे समोर येणारच आहेत. खरं तर सरकारने वेळीच ही जनगणना केली असती तर हे आधीच झालं असतं. आता उशिरा का होईना पण जनगणना सुरु असून त्याआधारे २०२७ मध्ये मतदारसंघांची संविधानिक पद्धतीने फेररचना होणारच आहे, मग आज भाजपकडून त्यासाठी इतकी घाई का केली जातेय, यामागील छुपा हेतू देखील समजून घेणं आवश्यक आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
पुरोगामी प्रतिमेवर डाग लागू न देण्याची जबाबदारी!
आज साहेब आजारी असताना, त्यांच्यामागं घेतल्या जाणाऱ्या या निर्णयामुळं त्यांच्या आयुष्यभराच्या या तपाचा भंग होऊ नये, हीच माझी अत्यंत प्रामाणिक भावना आहे. साहेबांच्या निष्ठेवर आणि पुरोगामी प्रतिमेवर कोणताही डाग लागू न देण्याची जबाबदारी आज आपल्या सर्वांच्याच खांद्यावर आहे. आपल्या पक्षातील काही खासदार आणि आमदार सत्तेसोबत जाण्याचा विचार करत असल्याने किंवा काहींना सत्तेसोबत जाण्यास भाग पाडलं जात असल्याने त्यांचा आपल्यावर दबाव असणं स्वाभाविक आहे, पण ज्यांना जायचं असेल त्यांना खुशाल जाऊ द्या.
त्यांचे खरे चेहरे देखील समोर येऊ द्या कुणी गद्दारी करणार असेल तर असे गद्दार आमदार, खासदार इथली स्वाभिमानी जनता पुन्हा कदापि निवडून देणार नाही कोणताही निर्णय घेताना केवळ खासदार, आमदार यांचं मत महत्त्वाचं नसतं तर पक्षासाठी निवडणुकीत रात्रंदिवस झटणारे लाखो कार्यकर्ते, पदाधिकारी, मतदार, विचार आणि नागरिकांची भावना देखील तेवढीच महत्वाची असते. त्याचा देखील विचार होणं गरजेचं आहे, असंही रोहित पवार यांनी म्हटले आहे.