Monsoon Session : सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, अजितदादांची राज्य सरकारवर कडवट टीका; शेतकरी मदतीवरुन सरकारला घेरण्याचे संकेत

| Updated on: Aug 16, 2022 | 5:21 PM

ज्या प्रकारे सरकार सत्तेत आलं आहे, त्याबाबत आमचं स्पष्ट मत असं आहे की हे शिंदे सरकार मुळातच लोकशाही आणि संसदीय परंपरेच्या चिंधड्या उडवत स्थापन झालं आहे. अजूनही हे सरकार विधीमान्य नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय.

Monsoon Session : सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, अजितदादांची राज्य सरकारवर कडवट टीका; शेतकरी मदतीवरुन सरकारला घेरण्याचे संकेत
अजित पवार, विरोधी पक्षनेते
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पहिल्याच अधिवेशनात जोरदार विरोधाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. कारण सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार घालण्याची घोषणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलीय. सर्व विरोधी पक्षांची बैठक पार पडली. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, सर्व विरोधी पक्षाचे आमदार उपस्थित होते. अधिवेशनाच्या (Assembly Session) निमित्तानं कामकाज होत असताना आमचं स्पष्ट मत आहे की, ज्या प्रकारे सरकार सत्तेत आलं आहे, त्याबाबत आमचं स्पष्ट मत असं आहे की हे शिंदे सरकार मुळातच लोकशाही आणि संसदीय परंपरेच्या चिंधड्या उडवत स्थापन झालं आहे. अजूनही हे सरकार विधीमान्य नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. अजूनही सुप्रीम कोर्टाचा निकाल लागलेला नाही. एकंदरीतच हे अधिवेशन फार कमी काळाचं आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतही आम्ही कालावधी वाढवण्याबाबत सांगितलं आहे, अशी माहितीही अजितदादांनी दिलीय.

‘ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी 75 हजार अनुदान द्या’

सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालण्याची वेगवेगळी कारणं आहेत. प्रचंड अतिवृष्टी झालेली आहे. भंडारा, गोंदिया जिल्ह्यात वाहतूक व्यवस्थाच बंद पडली आहे. अनेक पुलावरुन पाणी वाहत असल्यानं दोन्ही भागाचा संपर्क तुटलाय. ज्या प्रकारे शेतकरी, शेतमजुरांना मदत झाली पाहिजे ती होत नाही. विरोधी पक्ष म्हणून आम्ही समाधानी नाही. ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी 75 हजार अनुदान द्या. फळबागांच्या नुकसानापोटी हेक्टरी सव्वालाखाची मदत करा. अतिवृष्टी भागातील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क माफ करा, अशी मागणी अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केलीय.

‘शेतकऱ्यांना कुठलीही मदत मिळालेली नाही’

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, आम्ही एनडीआरएफच्या नियमांच्या दुप्पट मदत करु. पण एनडीआरएफचे निकषच कालबाह्य झाले आहेत. दुप्पट मदत जाहीर करुन शेतकऱ्यांना कुठलीही मदत मिळालेली नाही. आम्ही सरकारमध्ये असताना शेतकऱ्यांना तिप्पट मदत जाहीर केली होती. साधारण 15 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. अजूनही अतिवृष्टी सुरु असल्यानं त्यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीतीही अजित पवार यांनी व्यक्त केलीय.

‘आता वंदे मातरम् मध्येच काय काढलंय?’

सरकार कुणाचंही असलं तरी गरीब माणूस, शेतकरी अडचणीत असल्यावर त्याला पुन्हा उभं करण्यासाठी जी मदत द्यायला हवी ती होताना दिसत नाही. पीक कर्ज वाटपाचं टार्गेट ठेवलं त्याच्या निम्म्यानंही पीक कर्ज वाटप झालेलं नाही. जे महत्वाचे विषय आहेत त्यावर चर्चा करण्यापेक्षा नको ते विषय पुढे आणले जात आहेत आणि त्यावर चर्चा घडवल्या जात आहेत. आपण जय महाराष्ट्र म्हणतो, जय हिंद बोलतो, जय हरी बोलतो. आता वंदे मातरम् मध्येच काय काढलंय? त्याला विरोध नाही. पण तुम्ही महागाईवर बोलत नाही. इंधन दरवाढीवर बोलत नाही. जीएसटी वाढीवर बोलत नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना टोला लगावलाय.

मंत्रिमंडळात महिलांना प्रतिनिधित्व नाही. मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर केला. खातेवाटप उशिरा झालं. आता विरोधकांच्या प्रश्नालाही हे उत्तर देऊ शकत नाहीत. कारण यांचा अभ्यासच झालेला नाही, अशी टीकाही अजित पवार यांनी सरकारवर केलीय.