इम्तियाज जलील यांचं शक्तीप्रदर्शन, औरंगाबादेत हजारो लिटर पाण्याची नासाडी

| Updated on: Jul 29, 2019 | 3:57 PM

या रॅलीत हिरवा, निळा रंग उधळण्यात आला आणि त्यासोबत पाण्याची प्रचंड नासाडी करण्यात आली. या रॅलीत तब्बल 7 ते 8 टँकर पाण्याची नासाडी करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाण्याची इतकी उधळपट्टी केल्यामुळे आता इम्तियाज जलील यांच्यावर चौफेर टीका होत आहे.

इम्तियाज जलील यांचं शक्तीप्रदर्शन, औरंगाबादेत हजारो लिटर पाण्याची नासाडी
Follow us on

औरंगाबाद : एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz jaleel rally) यांच्या विजयी रॅलीत पाण्याची तुफान नासाडी करण्यात आली. इम्तियाज जलील हे खासदार झाल्यानंतर औरंगाबाद शहरात प्रथमच विजयी रॅली (Imtiyaz jaleel rally) काढण्यात आली. या रॅलीत हिरवा, निळा रंग उधळण्यात आला आणि त्यासोबत पाण्याची प्रचंड नासाडी करण्यात आली. या रॅलीत तब्बल 7 ते 8 टँकर पाण्याची नासाडी करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाण्याची इतकी उधळपट्टी केल्यामुळे आता इम्तियाज जलील यांच्यावर चौफेर टीका होत आहे.

इम्तियाज जलील यांच्या संसदेतील भाषणाची चर्चाही झाली. त्यांनी शेतकरी प्रश्न आणि दुष्काळावर जोरदार भाषण केलं. पण शक्तीप्रदर्शनात मात्र त्यांना दुष्काळ जाणवला नाही. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून घवघवीत यश मिळाल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद शहरातून विजयी रॅली काढली. या रॅलीत त्यांचे हजारो कार्यकर्ते आणि समर्थक सहभागी झाले होते. उत्साहाच्या भरात या समर्थकांनी रॅलीत सर्वत्र हिरवा आणि निळा गुलाल तर उधळलाच, पण त्यासोबत पाण्याची प्रचंड नासाडी सुद्धा केली.

औरंगाबाद शहरातील आझाद चौकापासून ते भडकल गेटपर्यंत इम्तियाज जलील यांची विजयी रॅली काढण्यात आली होती. दुपारी 4 वाजता निघालेली ही विजयी रॅली रात्री दहा वाजेपर्यंत सुरू होती. या रॅलीत इम्तियाज जलील यांच्या कार्यकर्त्यांनी जवळपास दहा ते बारा पाण्याचे टँकर आणून पाण्याचे फवारे मारत या पाण्याची उधळपट्टी केली. ज्या औरंगाबाद शहरात आठ-आठ दिवस नळाला पिण्याचे पाणी येत नाही, त्या औरंगाबाद शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी केल्यामुळे इम्तियाज जलील यांच्यावर टीका सुरू झाली आहे.

एकीकडे संसदेत औरंगाबादच्या पाण्याचा प्रश्न मांडायचा आणि दुसरीकडे शहरातच पाण्याची नासाडी करायची ही इम्तियाज जलील यांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका इम्तियाज जलील यांच्यावर होत आहे. औरंगाबाद शहराचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सुद्धा इम्तियाज जलील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

इम्तियाज जलील हे लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर एक चांगला सुशिक्षित आणि भान असलेला खासदार औरंगाबाद शहराला मिळाला म्हणून अनेक नागरिकांनी आनंद व्यक्त केला होता. मात्र याच खासदार महोदयांनी आपल्या विजयी रॅलीत पाण्याची तुफान उधळपट्टी केल्यामुळे सुशिक्षित खासदारांनी आतापासूनच रंग उधळायला सुरुवात केली आहे का अशी शंका आता उपस्थित केली जात आहे.