‘राणे कुटुंबाचा आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा डाव होता, मोदींनी कुटुंबप्रमुख कसा असावा हे दाखवून दिलं’, केसरकरांच्या वक्तव्यानं पुन्हा वादाला तोंड फुटणार?

| Updated on: Aug 05, 2022 | 4:02 PM

सुशांतसिंह राजपूत (Sushantsingh Rajput Case) प्रकरणात आदित्य ठाकरेंची बदनामी करण्यात आली. मोदींशी संपर्क साधून माहिती देण्यात आली. तेव्हा मोदींनी कुटुंबप्रमुख कसा असावा हे दाखवून दिलं, असं वक्तव्य केसरकर यांनी केलंय.

राणे कुटुंबाचा आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा डाव होता, मोदींनी कुटुंबप्रमुख कसा असावा हे दाखवून दिलं, केसरकरांच्या वक्तव्यानं पुन्हा वादाला तोंड फुटणार?
दीपक केसरकर, नारायण राणे, आदित्य ठाकरे
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : राज्याच्या राजकारणात ठाकरे आणि राणे यांच्यातील संघर्ष सर्वश्रृत आहे. ठाकरे असो की राणे दोघेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. सत्तापालटानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. तर ठाकरेंकडूनही त्यांना प्रत्युत्तर देण्यात आलंय. अशावेळी शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी आज केलेल्या एका वक्तव्यामुळे या वादात अजून एक ठिणगी उडण्याची शक्यता आहे. नारायण राणेंच्या कुटुंबाकडून आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा प्रयत्न झाला. सुशांतसिंह राजपूत (Sushantsingh Rajput Case) प्रकरणात आदित्य ठाकरेंची बदनामी करण्यात आली. मोदींशी संपर्क साधून माहिती देण्यात आली. तेव्हा मोदींनी कुटुंबप्रमुख कसा असावा हे दाखवून दिलं, असं वक्तव्य केसरकर यांनी केलंय.

 भाजप-सेनेची मनं का दुरावली?, केसरकरांनी सांगितलं

पत्रकार परिषदेत बोलताना केसरकर म्हणाले की, सुशांतसिंह राजपूत प्रकरण जेव्हा महाराष्ट्रात घडलं तेव्हा आदित्य ठाकरेंची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. ती बदनामी करण्यामध्ये आताचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ज्या पत्रकार परिषदा घेतल्या त्याचा मोठा वाटा होता. आमच्यासारखी लोकं जी ठाकरे कुटुंबावर प्रेम करतात. ती सुद्धा यामुळे दुखावली गेली होती. पुढच्या काळात उद्धव साहेबांची आणि पंतप्रधान मोदींची भेट झाली आणि जे काही मला उद्धवसाहेबांच्या आणि पंतप्रधान मोदींच्या बोलण्यातून समजत होतं की, खऱ्या अर्थाने कुटुंबप्रमुख कसा असावा, हे पंतप्रधान महोदयांनी त्याठिकाणी दाखवून दिलं.

आमदारांच्या निलंबनावेळी बोलणी सुरु होती!

तर मोदींशी संबंध जपण्यास ठाकरेंनी तयारी दाखवली होती. 12 आमदारांचं निलंबन झालं तेव्हा भाजपसोबत बोलणी सुरु होती. नारायण राणेंचा त्याचवेळी केंद्रात समावेश झाला. राणे केंद्रात गेल्याचं ठाकरेंना आवडलं नाही आणि बोलणी रखडली, असंही केसरकरांनी सांगितलं आहे. केसरकर म्हणाले की, मला खोटं बोलून कुणाचाही बदनामी करायची नाही. जे काही घडलं होतं तसंच्या तसं मी महाराष्ट्राच्या समोर आणतोय. या सगळ्या गोष्टीत खूप वेळ गेला आणि दरम्यानच्या काळात 12 लोकांचं निलंबन झालं. निलंबन झालं त्यावेळीही भाजपकडून निरोप आला होती की आपली बोलणी चालू आहेत. असं निलंबन आणि एवढ्या काळासाठी करणं योग्य नाही, अशी माहितीही केसरकर यांनी दिलीय.

‘एक शब्द खोटा निघाला तर सार्वजनिक क्षेत्रातून संन्यास घेईन’

दोन दिवसांनंतर पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेणार आहे. मी जे बोललो ते खरं आहे. यातला एक शब्द जरी खोटा निघाला तर सार्वजनिक क्षेत्रातून संन्यास घेईन, असंही केसरकांनी स्पष्ट केलंय. त्याचबरोबर शिंदे साहेबांना नक्षलवाद्यांचा थ्रेट आहे. तरी ते लोकांबरोबर जातात. लोकांना भेटतात. त्यामुळे आमचं टेन्शन वाढतं, असं मला एका ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं, असंही केसरकर म्हणाले. तसंच सर्वोच्च नायालयात सुनावणी सुरु आहे. अंतरिम ऑर्डर सोमवार, मंगळवारी येईल. त्यानंतर सुनावणी सुरुच राहील. त्यामुळे ऑर्डरचा मान ठेवण्यासाठी आम्ही थांबलो आहोत. कोर्टाचा मान ठेवावा असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही वाटतं. मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, केसरकर यांनी राणे कुटुंबाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राणे विरुद्ध ठाकरे यांच्यात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. तस राणे पिता-पुत्रांकडून केसरकर यांच्या या वक्तव्यावर काय प्रत्युत्तर दिलं जातं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. राणे पिता-पुत्रांनी यापूर्वीही अनेकदा ठाकरे पिता-पुत्रांवर टीका केल्यानंतर दीपक केसरकर यांनी राणेंना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे आता राणेंकडून काय भूमिका घेतली जाते हे पाहावं लागेल.