भाजपकडे कार्यकर्ते आहेत का? सगळे तर बिळात शिरले : नवाब मलिक

| Updated on: Feb 18, 2020 | 12:37 PM

महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजप 25 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात 400 ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहे.

भाजपकडे कार्यकर्ते आहेत का? सगळे तर बिळात शिरले : नवाब मलिक
Follow us on

मुंबई : “तुम्ही 25 तारखेला मोर्चा काढाल, पण भाजपकडे कार्यकर्ते आहेत का? सगळे तर बिळात शिरले आहेत”, असा खोचक टोला अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला लगावला (Minister Nawab Malik slams BJP). महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजप 25 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात 400 ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल (17 फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. त्यानंतर आज नवाब मलिक यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत भाजपवर सडकून टीका केली.

“सीएए, एनआरसी आणि एनपीआर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या डोक्यातील कायदे आहेत. भाजपने या कायद्यांची माहिती लोकांपर्यंत नीट पोहोचवलेली नाही. त्यामुळे लोकांमध्ये या कायद्यांबाबत भीती निर्माण झाली आहे”, असा दावा नवाब मलिक यांनी केला.

“एनआरसीला आम्ही शेवटपर्यंत विरोध करणार आहोत. या कायद्याला आम्ही महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही. भाजपने त्यांच्या पक्ष कार्यालयांत आंदोलने करावीत, कारण तेच लोकांपर्यंत हे कायदे नीट पोहचवू शकले नाहीत”, असा सल्ला नवाब मलिक यांनी भाजपला दिला.

नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरही सडकून टीका केली. “चंद्रकांत पाटील यांना मी सांगू इच्छितो की, त्यांनी स्वत:चा इलाज करावा. त्यांनी चांगला डॉक्टर बघावा. त्यांना रोग झाला आहे”, असा घणाघात नवाब मलिक (Minister Nawab Malik slams BJP) यांनी केला.

“कमळाबाईंना शिवसेनेनं सोडचिठ्ठी दिली आणि संसार थाटला नाही. शिवसेनेनं सोडचिठ्ठी दिली म्हणून त्यांना त्रास होतोय. आता ते रडत बसले आहेत. त्यामुळे सर्वकाही सुरु आहे. मात्र, त्याचा काही एक उपयोग होणार नाही”, अशा शब्दात नवाब मलिक यांनी टीका केली.

नवाब मलिक यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यावरुनही भाजपवर निशाणा साधला. “तुम्ही ट्रम्पला आणता. मात्र, अमेरिकेतील निवडणुकीचा हा एक प्रकारचा प्रचार आहे. देशाला या गोष्टीचा काहीच फायदा होणार नाही. देशात बेरोजगारी वाढली आहे. मोदींना देशातील गोरगरिबांची लाज वाटते. हे योग्य नाही”, असंदेखील नवाब मलिक म्हणाले.