जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या पुण्यातील घरात राष्ट्रवादीने खेकडे सोडले!

| Updated on: Jul 09, 2019 | 1:42 PM

शिवसेना नेते आणि जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या पुण्यातील घरात खेकडे सोडून राष्ट्रवादीने  निषेध आंदोलन केलं. पुण्यातील कात्रज भागात तानाजी सावंत यांचे घर आहे.

जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या पुण्यातील घरात राष्ट्रवादीने खेकडे सोडले!
Follow us on

पुणे : शिवसेना नेते आणि जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या पुण्यातील घरात खेकडे सोडून राष्ट्रवादीने  निषेध आंदोलन केलं. पुण्यातील कात्रज भागात तानाजी सावंत यांचे घर आहे. या घरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्यावतीने आंदोलन करण्यात आले. रत्नागिरीतील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणफुटीला खेकडे जबाबदार होते. खेकड्यांमुळे हे धरण फुटलं असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं होतं. तेव्हापासून त्यांच्यावर टीका होत आहे.

तिवरे धरण खेकड्यानी फोडलं, जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांचा अजब दावा 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी तानाजी सावंत यांच्या पुण्यातील घरात खेकडे सोडून आंदोलन केलं. यावेळी तानाजी सावंत यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीने निषेध केला. तसंच शिवाय तानाजी सावंत यांनी राजीनामा देण्याची मागणीही करण्यात आली.

तानाजी सावंत काय म्हणाले होते?

गेल्या 15 वर्षात धरणाला काही झालेलं नाही. धरणात खेकड्यांनी घर केल्यामुळे धरणाला गळती लागली. धरणाचं काम निकृष्ठ नव्हतं, असं तानाजी सावंत यांनी म्हटलं होतं.  तिवरे धरणफुटी ही एक नैसर्गिक आपत्ती होती. काही गोष्टी कुणाच्याही हातात नसतात. ही  दुर्घटना होती. गावकरी आणि अधिकाऱ्यांशी मी चर्चा केली, त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे धरण खेकड्यांनी पोखरलं, त्यामुळेच ते फुटलं असा अजब दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला होता.

नेमकं काय घडलं?

कोकणसह राज्यभरात गेल्या काही दिवसापासून पावसाचा जोर वाढला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरीत पावसाने कहर माजवला आहे. त्याचाच परिणाम म्हणून तिवरे-खडपोली धरण मंगळवारी 2 जुलैच्या रात्री साडेआठच्या सुमारास भरलं. आधीच धरण ओव्हरफ्लो झाल्याने त्याचा धोका स्थानिकांच्या लक्षात आला. काही क्षणात धरणाला भगदाड पडलं आणि एकच खळबळ उडाली. नागरिकांनी याची माहिती प्रशासनालाही दिली. धरण फुटल्यामुळे गावातील 24 जण वाहून गेले. त्यापैकी 10 मृतदेह हाती लागले आहेत.

कोणती गावं पाण्याखाली?

चक्क धरण फुटल्याने धरण क्षेत्रात येणाऱ्या ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावात पाणी घुसलं. पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की या त्यामध्ये 24 नागरिक वाहून गेले. अनेक घरात पाणी घुसलं. प्रापंचिक साहित्य विस्कटून गेलं. धरण फुटल्यामुळे तिवरे बेंडवाडीतील 13 घरं वाहून गेली आहे. तर आजूबाजूच्या गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

तिवरे धरण

फुटलेल्या तिवरे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 2 हजार 452 दशलक्ष घनफूट इतकी होती. या धरणाची लांबी 308 मीटर तर उंची 28 मीटर आहे. 2004 मध्ये या धरणातील गाळ उपसण्यात आला होता.

संबंधित बातम्या 

तिवरे धरणग्रस्तांची थट्टा, अधिकारी म्हणतात – वाहून गेलेल्या वस्तूंची बिलं आणा   

तिवरे धरण खेकड्यानी फोडलं, जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांचा अजब दावा