सकाळपासून सुरु असलेल्या बातम्यांवर अजित पवार यांनी दुपारी दिले उत्तर, काय म्हणाले अजित पवार वाचा दहा मुद्यांमधून

| Updated on: Apr 18, 2023 | 3:15 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार 40 आमदारांसोबत भाजपमध्ये दाखल होणार आहे, अशी चर्चा मंगळवारी सकाळपासून सुरु झाली. या चर्चांवर दुपारी अजित पवार यांनी माध्यमांसमोर येऊन खुलासा केला. अजित पवार खरंच भाजपमध्ये जाणार का? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी देताना मित्रपक्षाला टोला लगावला.

सकाळपासून सुरु असलेल्या बातम्यांवर अजित पवार यांनी दुपारी दिले उत्तर, काय म्हणाले अजित पवार वाचा दहा मुद्यांमधून
Ajit Pawar
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार 40 आमदारांसोबत भाजपमध्ये दाखल होणार आहे, अशी चर्चा मंगळवारी सकाळपासून सुरु झाली. या चर्चांवर विविध राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. परंतु दुपारपर्यंत अजित पवार माध्यमांसमोर आले नव्हते. यामुळे सकाळाचे पाच ते सहा तास अजित पवार यांची काय भूमिका आहे? यावर चर्चा सुरु होती. अखेर दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी अजित पवार माध्यमांसमोर आले. त्यांनी या प्रकरणी खुलासा केला. काय म्हणाले अजित पवार पाहूया

काय म्हणाले अजित पवार

  1. मी कुठल्याही आमदारांच्या सह्या घेतलेल्या नाहीत. मी भाजपला पाठिंबा देणार नाही आणि तशी शक्यताही वर्तवली नाही. या संदर्भातील ज्या बातम्या पेरल्या जात आहे, त्याच्यातून आमचे कार्यकर्ते नाराज होतात. त्यांनी त्यावर विश्वास ठेऊ नका
  2. संजय राऊत यांनी लिहिलेल्या रोखठोकसंदर्भात अजित पवार यांनी टोला लगावला. आमच्या पक्षातील बाजू आम्ही मांडू तुम्हाला मांडण्याचा कोणी अधिकार दिला ? असे म्हणत अजित पवारांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
  3. आम्ही सर्व राष्ट्रवादीतच आहोत असे म्हणत सुरू असलेल्या चर्चा निरर्थक आहेत. कार्यकर्त्यांनी संभ्रम निर्माण करू नये.
  4. मी प्रतिज्ञापत्रावर लिहून देऊ का? मी राष्ट्रवादी सोडणार नाही. पवार साहेबांच्या नेतृत्वाखालीच आम्ही काम करणार आहोत.
  5. राज्यातील महत्वाचे प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी अशा बातम्या पेरल्या गेल्या आहेत. राष्ट्रवादी पक्षात अनेक चढउतार आले, पण सध्या बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत.
  6. महाराष्ट्र भूषण पुरस्कारसंदर्भात आम्हाला राजकारण करायचे नाही. पण पुरस्कारासाठी १३ ते १४ कोटी खर्च केले, मग त्यासाठी चांगले मंडप का घातले नाही. पुरस्कार विततरण समारंभ पावसाळापूर्वी ढगाळ वातावरण असताना घेता आला असता.
  7. माझ्या ट्विटमध्ये खात्यात कोणताही बदल झालेला नाही. कोणत्याही बाबतीत ‘ध’ चा ‘मा’ करू नका.
  8. सध्या राज्यात असणाऱ्या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जात आहेत.
  9. मला भेटायला आलेले आमदार कामानिमित्त आले होते. सध्या सुरु असलेल्या चर्चांमध्ये काही तथ्य नाही.
  10.  कांदा उत्पादक शेतकरी, कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. अवकाळी पावसाचे संकटे झाले. मुख्यमंत्र्यांनी दौरा केला. परंतु जी मदत हवी होती, ती मिळाली नाही.