धुळ्यातील रोख रकमेप्रकरणी मोठी कारवाई, विधिमंडळ अधिकाऱ्याविरोधात निर्णय काय?

धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहात कोट्यवधी रुपयांची रोख सापडली आहे. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे.

धुळ्यातील रोख रकमेप्रकरणी मोठी कारवाई, विधिमंडळ अधिकाऱ्याविरोधात निर्णय काय?
dhule government rest house
| Updated on: May 22, 2025 | 7:47 PM

Dhule Crime : धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहातून तब्बल एक कोटी 84 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. धुळ्याच्या पोलीस प्रशासनाने पहाटे चार वाजेपर्यंत ही कारवाई केली आहे. दरम्यान ही रोकड जप्त करण्यात आल्यानंतर विधिमंडळाचे संशयित कक्ष अधिकारी किशोर पाटील यांना निलंबित करण्यात आलंय. तसेच विधिमंडळाकडून चौकशी समितीचीही स्थापना करण्यात आली आहे.

कक्ष अधिकारी किशोर पाटील निलंबित

धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मधून ही कोट्यवधींची रक्कम जप्त करण्यात आली. हे पैसे पकडल्यानंतर विधिमंडळाच्या अंदाज समितीसीठी पाच कोटी ठेवल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केला. या आरोपांनंतर विधिमंडळाचे कक्ष अधिकारी किशोर पाटील यांना निलंबित करण्यात आलं आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. ही चौकशी करण्यासाठी एक समितीही स्थापन करण्यात आली आहे.

पीए खोलीला कुलूप लावून पळाले

समितीतील 11 आमदारांना हे पैसे देण्यासाठीच अधिकाऱ्यांनी हे पैसे जमा केले असा आरोप अनिल गोटे यांनी केला आहे. 102 ही खोली किशोर पाटील यांच्य नावावर बुक होती. किशोर पाटील हे अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांचे खासगी पीए आहेत. शिवसैनिकांनी धडक देताच खोतकरांचे पीए खोलीला कुलूप लावून पळाले, असा आरोप अनिल गोटे यांनी केला. तसेच ही रक्कम नेमकी इथं कशी आली, याचा तपास करा, अशी मागणी करत अनिल गोटे हे तब्बल चार तास खोलीच्या बाहेर होते. त्यानंतर पीडब्ल्यूडीचे अधिकारी, तहसीलदार यांच्या उपस्थितीत ही खोली उघडण्यात आली.

अर्जुन खोतकर यांनी काय भूमिका मांडली?

सरकारला आणि समितीला बदनाम करण्यासाठी असं करण्यात आलं आहे का, असा संशय आम्हाला आहे. गोटे यांच्या आरोपांत कसलंही तथ्य नाही. आम्ही हे सर्व आरोप फेटाळतो, असं अर्जून खोतकर यांनी सांगितलंय.

दरम्यान, आता या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर नेमकं काय होणार? या कोट्यवधी रुपयांच्या मागे नेमकं कोण आहे? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.