शेतकऱ्याची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये ओमराजे आणि उद्धव ठाकरेंचं नाव

| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

उस्मानाबाद : कसबे तडवळे गावातील शेतकऱ्याची फसवणूक झाल्याने त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. दिलीप ढवळे असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे. घटनास्थळावरुन दोन सुसाईड नोट सापडल्या आहेत. एका सुसाईड नोटमध्ये शिवसेनेचे उस्मानाबादचे उमेदवार ओमराजे निंबाळकर, तर दुसऱ्या सुसाईड नोटमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव आहे. सुसाईड नोटमध्ये ओमराजे निंबाळकर आणि उद्धव ठाकरे यांचे […]

शेतकऱ्याची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये ओमराजे आणि उद्धव ठाकरेंचं नाव
Follow us on

उस्मानाबाद : कसबे तडवळे गावातील शेतकऱ्याची फसवणूक झाल्याने त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. दिलीप ढवळे असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे. घटनास्थळावरुन दोन सुसाईड नोट सापडल्या आहेत. एका सुसाईड नोटमध्ये शिवसेनेचे उस्मानाबादचे उमेदवार ओमराजे निंबाळकर, तर दुसऱ्या सुसाईड नोटमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव आहे. सुसाईड नोटमध्ये ओमराजे निंबाळकर आणि उद्धव ठाकरे यांचे नाव असल्याने उस्मानाबादसह राज्यभर एकच खळबळ उडाली आहे.

प्रकरण काय आहे?

तेरणा कारखान्याने कर्जापोटी दिलीप ढवळे यांची जमीन वसंतदादा सहकारी बँकेकडे गहाण ठेवली होती. कारखान्याने कर्ज न भरल्याने बँकेने ढवळे यांची जमीन लिलावात काढली होती. या तणावामुळे ढवळे यांनी शेतात गळफास लावून आत्महत्या केली.

दोन सुसाईड नोट

दिलीप ढवळे यांच्या खिशात दोन सुसाईड नोट सापडल्या. त्यातील एका चिठ्ठीत म्हटलंय की, “आत्महत्येला ओमराजे निंबाळकर आणि वसंतदादा बँकेचे चेअरमन विजय दंडनाईक जबाबदार आहेत.” तर दुसऱ्या चिठ्ठीत म्हटलंय, “13 शेतकऱ्यांनी तेरणा कारखान्याबाबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र भेट झाली नाही.”

शिवसेनेचे उस्मानाबाद मतदारसंघातील उमेदवार ओमराजे निंबाळकरांना मतदान करु नका, असे आवाहनही या सुसाईड नोटमधून केले आहे.

पोलीस या दोन्ही चिट्टींची शहानिशा करत असून पुढील चौकशी करत आहेत. या प्रकरणी ढोकी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत शेतकरी ढवळे यांचा मुलगा निखिल आणि भाऊ राज ढवळे यांनी या प्रकारणाच्या चौकशीची मागणी केली आहे.

ओमराजे निंबाळकर काय म्हणाले?

तेरणा कारखान्याने बँकेत पैसे जमा केले होते. मात्र बँकेची चूक असल्याने ते पैसे संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाले नाहीत. आम्ही कायम ठेकेदारांच्या पाठीशी होतो, अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकरांनी दिली.

2010 साली वसंतदादा बँकेने कर्ज वाटप केले होते. तेरणा कारखान्याने चेक वसंतदादा बँकेत पाठवला होता. पैसे ज्या ठेकेदार यांनी काम केलं होते, त्यांच्या खात्यात जमा करा, असे सांगितले होते. मात्र ते पैसे संबंधित शेतकऱ्याच्या नावे जमा न करता सर्व ठेकेदार यांच्या नावाने समसमान जमा केले. बँकेच्या या कृत्याबाबत आर बी ट्रेंडसकडे दाद मागितली, कृत्य चुकीचे असल्याचे ग्राहक मंच आणि हाय कोर्टात माडंले. दुर्दैवाने मृत व्यक्तीच्या नावाने राजकारण केलं जात आहे. लवकरच वस्तुस्तिथी बाहेर येईल, असेही ओमराजे निंबाळकर म्हणाले.

“शेतकरी दिलीप ढवळे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी लवकर गुन्हा नोंद करावा. पोलीस कोणत्या दबावाला बळी पडत आहेत. गुन्हा दाखल न झाल्यास निवडणूक आयोगाकडे दाद मागू”, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

उस्मानाबादमध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस उरले असताना, ही घटना घडल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली आहेच, सोबत शेतकऱ्यांमध्येही अस्वस्थता पसरली आहे. दरम्यान, या घटनेची उस्मानाबाद पोलीस अधिक चौकशी करत आहेत.