पुण्यात शिवसैनिक ‘मातोश्री’चा आदेश धुडकावण्याच्या तयारीत

| Updated on: Oct 01, 2019 | 9:43 PM

पुण्यातील आठच्या आठ जागा (Shivsena Pune Assembly Seats) भाजपला मिळाल्या आहेत. त्यामुळे पुण्यात शिवसेनेत बंडाळी माजण्याची शक्यता आहे.

पुण्यात शिवसैनिक मातोश्रीचा आदेश धुडकावण्याच्या तयारीत
Follow us on

पुणे : भाजप-शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब झालंय. पण, युतीच्या जागावाटपात पुण्यातून शिवसेनेला (Shivsena Pune Assembly Seats) थेट हद्दपार केल्याचं चित्रं आहे. कारण, पुण्यातील आठच्या आठ जागा (Shivsena Pune Assembly Seats) भाजपला मिळाल्या आहेत. त्यामुळे पुण्यात शिवसेनेत बंडाळी माजण्याची शक्यता आहे. पुण्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ‘मातोश्री’वर येऊन त्यांचं म्हणणंही मांडलं आहे. पण भाजपने उमेदवारही जाहीर केल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे.

पुण्यात आठ पैकी दोन ते तीन जागा शिवसेनेला मिळाव्यात यासाठी शिवसैनिक आग्रही आहेत. अनेकांनी आपल्या मतदारसंघात कामालाही सुरुवात केली होती. पण युतीच्या घोषणेनंतर जागावाटप जाहीर झाल्यावर आपल्या पदरात काहीच न मिळाल्याने शिवसैनिक प्रचंड नाराज झाले. आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी शहरप्रमुख संजय मोरे यांनी थेट मातोश्रीचा दरवाजा ठोठावला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त करत किमान एक जागा पदरात टाकण्याची विनंती केली.

शिवसेना शहरप्रमुखांनी मातोश्रीवर धाव घेतली असली, तरी पुण्याचे शिवसैनिक मात्र बंडाच्या तयारीत आहेत. शिवसेनेचं अस्तित्व टिकवण्यासाठी निवडणूक लढवणं त्यांना आवश्यक वाटतंय. पण जर जागा दिली नाही, तर कसबा मतदारसंघातून बंडाचे निशाण फडकवण्याची तयारी नगरसेवक विशाल धनवडे यांनी केली आहे. स्वाभिमान दाखवण्यासाठी निवडणूक लढणं गरजेचं असल्याचं सांगत, प्रसंगी मातोश्रीचा आदेश धुडकावून लावण्याची तयारीही काही शिवसैनिकांनी केली आहे.

कोथरुड हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला मतदार संघ. यंदा या जागेवर पुण्यातील शिवसैनिक दावा सांगत होते, मात्र तिथे तर थेट कोल्हापूरच्या चंद्रकांत पाटलांना उमेदवारी देण्यात आली. कोथरुडमधून शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हे इच्छुक होते. त्यांनी मोर्चे बांधणीही केली होती. मात्र तिथेही शिवसैनिकांची घोर निराशा झाली.

दरम्यान, विद्यमान आमदार सोडून जागा वाटप झाल्याचं सांगत, शिवसेनेचे मंत्री असलेले विजय शिवतारे जागावाटपावर सावरासावर करण्याचा प्रयत्न करत आहेत.

एकंदरीतच, पुण्यासारख्या मोठ्या शहरात एकही जागा न मिळाल्याने शिवसैनिक अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळं नेहमी आदेशावर चालणाऱ्या शिवसेनेत संतप्त कार्यकर्ते बंडाची तयारी करताना दिसत आहेत. आता ‘मातोश्री’हून काय आदेश येतो? आणि शिवसैनिकांचे हे बंड कायम राहतं का? हे लवकरच समजेल.