भगीरथ भालके, समाधान आवताडेंच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, अपक्ष उमेदवाराचा हायकोर्टात जाण्याचा इशारा

| Updated on: Mar 31, 2021 | 4:51 PM

राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके आणि भाजपचे उमेदवार समाधान आवताडे अध्यक्ष असलेल्या दोन्ही कारखान्यांवर आरआरसीची कारवाई झाल्याचा मुद्दा हळणकर यांनी उपस्थित केलाय.

भगीरथ भालके, समाधान आवताडेंच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, अपक्ष उमेदवाराचा हायकोर्टात जाण्याचा इशारा
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार समाधान आवताडे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके
Follow us on

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असतानाच आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसमोर नवी अडचण निर्माण झाली आहे. अपक्ष उमेदवार माऊली हळणवर यांनी दोन्ही उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके आणि भाजपचे उमेदवार समाधान आवताडे अध्यक्ष असलेल्या दोन्ही कारखान्यांवर आरआरसीची कारवाई झाल्याचा मुद्दा हळणकर यांनी उपस्थित केलाय. (Independent candidate objects to NCP candidate Bhagirath Bhalke and BJP candidate Samadhan Avtade)

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके आणि भाजपचे उमेदवार समाधान आवताडे हे अध्यक्ष असलेल्या दोन्ही कारखान्यांवर आरआरसीची कारवाई झाली आहे. यो दोन्ही उमेदवारांचा अर्ज शेतकऱ्यांचे थकबाकीदार म्हणून रद्द करण्यात यावा अशी मागणी अपक्ष उमेदवार माऊली हळणकर यांनी केली आहे. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याबाबतचा निर्णय राखून ठेवला आहे. यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांचे अर्ज मंजूर केले तर मुंबई उच्च न्यायलयात दाद मागणार असल्याचंही हळणकर यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, निवडणूक निर्ण अधिकारी गजानन गुरव यांनी भगीरथ भालके आणि समाधान आवताडे यांचा उमेदवारी अर्ज मंजूर केला आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवार माऊली हळणकर हे आता उच्च न्यायालयात जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हळणकर यांचा आक्षेप काय?

भाजपचे उमेदवार समाधान अवताडे हे दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. त्यांनी 45 कोटी रुपयांची रक्कम थकवल्यामुळे  त्यांच्यावर आरआरसी कारवाई झाली आहे. अवताडे हे सरकार आणि  शेतकऱ्यांचे थकबाकीदार आहेत, म्हणून त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात यावा. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. त्यांच्या कारखान्यावर 36 कोटीची थकबाकी आहे. त्यामुळे थकबाकीदार म्हणून त्यांचाही अर्ज नामंजूर करण्यात यावा, अशी मागणी हळणकर यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची ही मागणी धुडकावून लावत दोन्ही उमेदवारांचा अर्ज मंजूर केलाय.

भाजप उमेदवाराविरुद्ध चुलतभावाचा अर्ज

पंढरपूरच्या रिंगणात भाजपनं समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे. तर अन्य उमेदवार मिळून तब्बल 39 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अशा स्थितीत भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना बंडाचा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या उमेदवारीला घरातूनच विरोध होत असल्याचं पाहायला मिळतंय. समाधान आवताडे यांचे चुलत भाऊ सिद्धेश्वर आवताडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

नगराध्यक्षांच्या पतीनेही भरला अर्ज

पंढरपूरच्या भाजप पुरस्कृत नगराध्यक्षा साधना भोसले यांचे पती नागेश भोसले यांनीही भाजप विरोधात दंड थोपटले आहेत. भोसले यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय. या दोन उमेदवारांमुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपचे नेते हे पक्षांतर्गत बंड कसं थंड करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

स्वाभीमानीमुळे राष्ट्रवादीची अडचण!

पंढरपूर मंगळवेढा पोट निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालकेंच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालं. स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील यांच्या उमेदवारी अर्जासोबत आज स्वाभिमानी पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याद्वारे महाविकास आघाडीच्या विरोधात रणशिंग फुंकलं असल्याचं बोललं जात आहे. माजी खासदार राजू शेट्टी स्वाभिमानीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पंढरपुरात तळ ठोकून राहणार आहेत. ते गावोगावी जाऊन प्रचार सभाही घेणार आहेत, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

संबंधित बातम्या :

पंढरपूर पोटनिवडणुकीत धक्क्यावर धक्के, भाजप उमेदवाराविरुद्ध चुलतभावाचा अर्ज, तब्बल 39 जण रिंगणात

जयंत पाटील म्हणाले, फडणवीस पंढरपुरातील उमेदवार मागे घेतील, आता दरेकरांचं मोठं वक्तव्य

Independent candidate objects to NCP candidate Bhagirath Bhalke and BJP candidate Samadhan Avtade