पंकजा मुंडे नाराज नाहीत, चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा; राजीनामे न देण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन

| Updated on: Jul 13, 2021 | 4:57 PM

केंद्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवा. एक स्वल्पविराम द्या, मी तुमचा राजीनामा स्वीकारणार नाही, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला. दरम्यान, पंकजा मुंडे नाराज नाहीत, कार्यकर्त्यांनीही राजीनामे देऊ नये, असं आवाहन भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.

पंकजा मुंडे नाराज नाहीत, चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा; राजीनामे न देण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन
चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे
Follow us on

नागपूर : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळालं नसल्यानं पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. त्यावरुन राज्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये राजीनामा सत्र सुरु झालंय. अशावेळी खुद्द पंकजा मुंडे यांनी आज वरळी इथल्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी केंद्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवा. एक स्वल्पविराम द्या, मी तुमचा राजीनामा स्वीकारणार नाही, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला. दरम्यान, पंकजा मुंडे नाराज नाहीत, कार्यकर्त्यांनीही राजीनामे देऊ नये, असं आवाहन भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. (Pankaja Munde is not upset, claims Chandrasekhar Bavankule)

पंकजा मुंडे नाराज नाहीत. त्यांनी कार्यकर्त्यांना राजीनामे परत घेण्यास सांगितलं आहे. भाषणात जरी त्यांनी कौरव, पांडव, धर्मयुद्ध असे काही शब्द वापरले असले किंवा दृष्टांत दिले असले तरी त्यांनी कार्यकर्त्यांना काय संदेश दिला, काय निर्देश दिले हेच राजकीय दृष्ट्या महत्वाचं आहे. भाषणाचा मतितार्थ काढायचा असतो आणि पंकजा मुंडे यांच्या भाषणाचा मतितार्थ म्हणजे कार्यकर्त्यांनी राजीनामे परत घ्यावे आणि कामाला लागावे. पंकजा मुंडे या पक्षापासून दूर जाणार नाहीत असा विश्वास आहे. पंकजा मुंडे यांच्याशी आपलं नेहमीच बोलणं होत असतं. ओबीसी मेळाव्याच्या निमित्ताने आम्ही नुकतंच भेटलो होतो. मी दाव्याने सांगू शकतो की त्या नाराज नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनीही राजीनामे देऊ नयेत, अशी विनंती बावनकुळे यांनी केलीय.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

पंकजा मुंडे म्हणाल्या, “आपली शक्ती कमी करण्याचा डाव आहे, पण आपण हा डाव पूर्ण होऊ द्यायाचा नाही. मला पुढेही खडतर मार्ग दिसतो आहे. योग्य निर्णय घेण्याची योग्य वेळ असते. आपण वारकरी आहोत, सात्विक आहोत. ज्या दिवशी छत अंगावर पडेल तेव्हा बघू”

माझा निवडणुकीत पराभव झाला. आज माझ्याकडे पदाचा अलंकार नाही. स्वाभिमानी राजकारण केले आहे. पंतप्रधानांनी मला झापल्याचं वृत्त काही माध्यमांनी चालवलं. मात्र माझ्या चेहऱ्यावर तसं काही दिसतं का? मला पंतप्रधानांनी कधी अपमानित केले नाही. नाही राष्ट्रीय अध्यक्षांनी अपमानित केले, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न

पाच पांडव का जिंकले कारण त्यांच्याकडे संयम होता. जो चांगला असतो तो युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतो. मी धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न तेव्हापर्यंत करते जेव्हा पर्यंत शक्य आहे. आम्ही कुणालाच भीत नाही. मी कुणाचा निरादार करत नाही. मी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या माणसाचा आदर करते. मला स्वतःसाठी काही नको, मला तुमच्यासाठी हवं आहे. मी पदावर नाही. मी आज तुमच्या पालकत्वाच्या भूमिकेत आहे. मला कशाचीही आवश्यकता नाही, असं पंकजा मुंडेंनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

मी संपले असते तर मला संपवायचे प्रयत्नही संपले असते; पंकजा मुंडेंचा भाजपवर अप्रत्यक्ष वार

दबावतंत्र करायचं असेल तर शक्तीप्रदर्शनासाठी जागा पुरणार नाही; पंकजा मुंडेंचा सूचक इशारा

Pankaja Munde is not upset, claims Chandrasekhar Bavankule