‘त्या’ नेत्यांची पक्षाला गरज नाही, बॅट्समन आमदारावर मोदी संतापले

| Updated on: Jul 02, 2019 | 4:06 PM

भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत मोदींनी नेत्यांसमोर इंदूरमधील भाजप आमदार आकाश विजयवर्गीय यांच्या कृत्यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. शिवाय मुलगा कुणाचाही असो, हे खपवून घेतलं जाणार नाही, अशा नेत्यांची पक्षाला गरज नाही, असंही मोदींनी सुनावल्याची माहिती आहे.

त्या नेत्यांची पक्षाला गरज नाही, बॅट्समन आमदारावर मोदी संतापले
Follow us on

नवी दिल्ली : महापालिका अधिकाऱ्याची बॅटने धुलाई करणाऱ्या भाजप आमदारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगलेच संतापले असल्याची माहिती आहे. भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत मोदींनी नेत्यांसमोर इंदूरमधील भाजप आमदार आकाश विजयवर्गीय यांच्या कृत्यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. शिवाय मुलगा कुणाचाही असो, हे खपवून घेतलं जाणार नाही, अशा नेत्यांची पक्षाला गरज नाही, असंही मोदींनी सुनावल्याची माहिती आहे. आकाश विजयवर्गीय हे भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांचे चिरंजीव आहेत.

दुर्वव्यवहार कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाऊ शकत नाही. राजकारणात एक शिस्त असावी लागते. या प्रकारची वागणूक देणाऱ्या नेत्यांना पक्षातून काढलं जावं. वागणूक बिलकुल सहन केली जाणार नाही. मुलगा कोणत्याही नेत्याचा असो, त्याला मनमानी करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. सर्वांसाठीच हा नियम लागू होतो, असं मोदींनी स्पष्ट केल्याचं बैठकीतील सूत्रांनी सांगितलं.

मोदींनी ही ताकीद देताना कुणाचंही नाव घेतलं नाही. पण बॅट्समन आकाश विजयवर्गीय यांच्या प्रकरणानंतर मोदींनी सर्वांना इशारा दिला असल्याची माहिती आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी आलेल्या महापालिका अधिकाऱ्याची विजयवर्गीय यांनी बॅटने धुलाई केली होती. या घटनेनंतर मोठा वाद झाला आणि आकाश विजयवर्गीय यांना तुरुंगातही जावं लागलं होतं.

आकाश विजयवर्गीय यांनी जामिनावर बाहेर येताच जुने रंग पुन्हा दाखवण्यास सुरुवात केली. जेलमधली वेळ चांगली गेली, आता मी लोकांची सेवा करणार आहे. पोलिसांसमोरच एखाद्या महिलेला ओढलं जात असेल त्या परिस्थितीमध्ये मी दुसरं काहीही करु शकत नव्हतो. त्यामुळे मी जे केलं त्याबाबत कोणताही पश्चात्ताप नाही. पण देवाला प्रार्थना करेन की मला पुन्हा बॅटिंग करण्याची संधी देऊ नये, अशा शब्दात आकाश विजयवर्गीय यांनी पुन्हा एकदा तोच रंग दाखवला.