प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसला डेडलाईन, एमआयएमसोबत युती कायम

| Updated on: Aug 27, 2019 | 6:30 PM

वंचित बहुजन आघाडीचे (VBA) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काँग्रेसला (Congress) युतीबाबत निर्णय घेण्यासाठी डेडलाईन दिली आहे. वंचितने काँग्रेसला विधानसभा निवडणुकीसाठी 144 जागांची ऑफर दिली आहे.

प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसला डेडलाईन, एमआयएमसोबत युती कायम
Follow us on

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे (VBA) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काँग्रेसला (Congress) युतीबाबत निर्णय घेण्यासाठी डेडलाईन दिली आहे. वंचितने काँग्रेसला विधानसभा निवडणुकीसाठी 144 जागांची ऑफर दिली आहे. त्यावर 31 ऑगस्टपर्यंत वाट पाहू, त्यानंतर वंचित आपली भूमिका जाहीर करेल, असंही आंबेडकरांनी स्पष्ट केलं.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला 50-50 प्रमाणे विधानसभेसाठी 144 जागांची ऑफर दिली आहे. काँग्रेसने यावर 31 ऑगस्टपर्यंत निर्णय घ्यावा. त्यादिवशी वंचितची बैठक होणार आहे. त्यामुळे 31 ऑगस्टला आम्ही आमची पुढील भूमिका जाहीर करू.”

एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी विधानसभेसाठी 100 जागांची मागणी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी त्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, “एमआयएम पक्ष लोकसभेत वंचित बहुजन आघाडीसोबत होता आणि आगामी विधानसभेला देखील सोबत आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आहेत. त्यामुळे जी काही बोलणी व्हायची ती त्यांच्याशी होईल. ती बोलणी सकारात्मक आहे. त्यावर लवकरच अंतिम निर्णय होईल.”

‘ईडीच्या कारवाईला राजकीय वास’

ईडीकडून होत असलेल्या चौकशी आणि इतर कारवाईवर प्रकाश आंबेडकर यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, “ईडी ज्या पद्धतीने चौकशी करत आहेत, त्यावरुन या कारवाईला राजकीय वास असल्याचे स्पष्ट होते. सत्ताधारी पक्षाचा विरोधकांना संपवण्याचा डाव आहे. त्यामुळे मी मतदारांना आवाहन करेल, त्यांनी विरोधी पक्ष जिवंत ठेवावा.”

विरोधी पक्षांना जसं घाबरवलं जातं आहे, तसंच त्यांच्या पक्षातील लोकांना देखील घाबरवलं जातं आहे. अगदी उद्धव ठाकरे यांना देखील गप्प बसण्यास सांगितलं गेलं आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. विरोधी पक्षातीलच नाही, तर पक्षातील विरोधकांनाही संपवायचे प्रयत्न सत्ताधारी पक्ष करत असल्याचं ते म्हणाले.

2 जी घोटाळ्यातील आरोपी भाजपच्या काळात सुटले

संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात ज्या 2 जी घोटाळ्याचा विषय आला. त्या घोटाळ्यातील आरोपी भाजपच्या काळात सुटल्याचाही मुद्दा आंबेडकर यांनी मांडला. प्रशासनातील अधिकाऱ्यांचा एक वर्ग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानसिकतेचा आहे. त्यांनीच 2जी सारख्या घोटाळ्याचे कुंभाड रचले का? असाही प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला.

‘मुख्यमंत्र्यांनी राज्य बँक घोटाळ्याचा अहवाल सर्वांसमोर मांडावा’

प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र राज्य बँकेच्या घोटाळ्यावरही भाष्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र राज्य बँक घोटाळ्याचा अहवाल सर्वांच्या समोर मांडावा, असंही ते म्हणाले. ते म्हणाले, “राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याचा अहवाल फडणवीस यांनी सार्वजनिक करावा. नाहीतर डोंगर पोखरून उंदीर निघाला असं होऊ नये.”