अजित पवारांच्या पायगुणामुळे आमची सत्ता गेली : प्रवीण दरेकर

| Updated on: Sep 08, 2020 | 2:40 PM

अजितदादांचा पायगुण काय होता हे महाराष्ट्राने पाहिलं. आमच्यासोबत अजितदादा आले सत्तेचं काय झालं?" असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला.

अजित पवारांच्या पायगुणामुळे आमची सत्ता गेली : प्रवीण दरेकर
Follow us on

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पायगुणामुळे आमची सत्ता गेली, अशा शब्दात विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी खंत व्यक्त केली. पहाटेच्या शपथविधीच्या आठवणी अद्यापही भाजप नेत्यांच्या मनात ताज्या दिसत आहेत. (Pravin Darekar taunts Ajit Pawar says BJP lost power due to his bad luck)

“शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे विधानपरिषदेच्या उपसभापती पदी आल्या आणि आमचं सरकार आलं, म्हणून त्यांना पुन्हा या पदावर नियुक्त केलं” असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान सभेत सांगितलं. त्यावर बोलताना “अजितदादांचा पायगुण काय होता हे महाराष्ट्राने पाहिलं. आमच्यासोबत अजितदादा आले सत्तेचं काय झालं?” असा टोला दरेकर यांनी लगावला. अजित पवारांच्या पायगुणाचा उल्लेख करत असताना, “त्यांच्या पायगुणाने आमची सत्ता गेली” ही खंत प्रवीण दरेकर यांनी बोलून दाखवली.

विधानपरिषद उपसभापती निवडीवर आमचा आक्षेप कायम आहे, अशी भूमिका प्रवीण दरेकर यांनी यावेळी मांडली. सरकारची भूमिका हट्टाची आहे. गुरुवारी न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे, असे असतानाही ही निवडणूक घेण्यात आली, असे दरेकर म्हणाले.

पहा व्हिडीओ :

भाजपने हायकोर्टात धाव घेतल्याने विधानपरिषद उपसभापती पदाच्या निवडणुकीत रंगत वाढली होती, मात्र आपल्याला कोर्टाने बोलावले नसल्याचे सांगत सभापती रामराजे निंबाळकर यांनी निवडणूक प्रक्रिया सुरु केली आणि विधानपरिषदेच्या उपसभापती पदी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची पुनर्नियुक्ती झाली.

भाजपकडून दिग्गज नेते आणि विधानपरिषद आमदार भाई उर्फ विजय गिरकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनाच पुन्हा संधी देण्यात आली. मात्र विरोधकांच्या सभात्यागामुळे डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली.

कोण आहेत नीलम गोऱ्हे?

  • नीलम गोऱ्हे शिवसेनेच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या आहेत
  • शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या अशी त्यांची ओळख आहे
  • सलग दुसऱ्या वर्षी त्यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड
  • शिवसेनेकडून अनेक वर्षापासून विधानपरिषदेचं प्रतिनिधित्व
  • नीलम गोऱ्हे आतापर्यंत तीनवेळा विधानपरिषदेवर निवड
  • महिला प्रश्नावर आक्रमकपणे मात्र अभ्यासू भूमिका मांडण्यात अग्रेसर
  • राज्य सरकारच्या विशेष हक्क समितीचे अध्यक्षपदही भूषवलं

(Pravin Darekar taunts Ajit Pawar says BJP lost power due to his bad luck)

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी डॉ नीलम गोऱ्हे यांच्या बिनविरोध निवडीबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. “महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये नीलमताई स्वतः धावून जातात हे आपण पाहिले आहे. त्यांची उपसभापतीपदी दुसऱ्यांदा निवड झाली असून त्यांच्या यशाची कमान अशीच उंचावत जावो” असेही मुख्यमंत्री शुभेच्छापर भाषण करताना म्हणाले.

“कोरोना संकटकाळात दोन दिवसाच्या अधिवेशनात काही आमदार अनुपस्थित आहेत. गोपीचंद पडळकर, परिणय फुके, प्रविण पोटे हे परिषदेवरील आमदार कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यात निवडणुकीची घाई का?” असा प्रश्न प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला होता. विरोधीपक्षांनी कोविड काळात उपसभापती निवडणुकीला स्थगितीसाठी जी याचिका केली होती, त्यावर मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी होणार आहे.

संबंधित बातम्या :

… तर आम्ही घरी जातो, हक्कभंग प्रस्तावावरुन गदारोळ, देवेंद्र फडणवीस आक्रमक

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी पुन्हा शिवसेनेचा बुलंद आवाज, डॉ. नीलम गोऱ्हे यांची फेरनिवड

अर्णव गोस्वामी सुपारीबाज पत्रकार, हक्कभंग दाखल करा, सभागृहात शिवसेना आक्रमक

(Pravin Darekar taunts Ajit Pawar says BJP lost power due to his bad luck)