विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाला विरोध, कोणाचं नाव आघाडीवर?

| Updated on: Nov 28, 2019 | 9:19 AM

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं नाव आता विधानसभा अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे.

विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाला विरोध, कोणाचं नाव आघाडीवर?
Follow us on

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला राष्ट्रवादीतून विरोध (Prithviraj Chavan Opposed) होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पृथ्वीराज चव्हाणांचे आडनावबंधू अर्थात काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचं नाव आता विधानसभा अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारच पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा अध्यक्षपद देण्याबाबत फारसे अनुकूल नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता आहे. परंतु खुद्द अशोक चव्हाण विधानसभा अध्यक्षपद स्वीकारण्याबाबत अनुत्सुक असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता आहे.

शिवसेनेला मुख्यमंत्रिपद, राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद, तर काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद देण्याबाबत ठरल्याचं म्हटलं जातं. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (गुरुवार 28 नोव्हेंबर) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मुंबईत शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कच्या भव्य मैदानात संध्याकाळी सहा वाजून 40 मिनिटांच्या मुहूर्तावर हा ग्रँड शपथविधी सोहळा पार पडणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोण शपथ घेणार, याची उत्सुकता आहे.

उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांचे नाव निश्चित समजले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबतच जयंत पाटील आणि छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. अजित पवार मात्र आज मंत्रिपदाची शपथ घेणार नसल्याची माहिती आहे. तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण शपथ घेणार असल्याचं म्हटलं जातं. मात्र अशोक चव्हाणांना विधानसभा अध्यक्षपद देण्यावर शिक्कामोर्तब झालं, तर पृथ्वीराज चव्हाण कॅबिनेटमध्ये दिसणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

मंत्रिमंडळाचं संभाव्य वाटप

शिवसेना –

11 कॅबिनेट + 4 राज्यमंत्री + 1 मुख्यमंत्री – एकूण 16

राष्ट्रवादी –

11 कॅबिनेट (उपमुख्यमंत्रिपदासह) + 4 राज्यमंत्री – एकूण 15

काँग्रेस –

9 कॅबिनेट + 3 राज्यमंत्री – एकूण 12 + विधानसभा अध्यक्षपद

  • गृह, अर्थ, उद्योग एका पक्षाकडे असण्याची शक्यता (राष्ट्रवादी)
  • महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि ऊर्जा दुसऱ्या पक्षाकडे असण्याची शक्यता (काँग्रेस)
  • नगरविकास, जलसंपदा, MSRDC तिसऱ्या पक्षाला दिलं जाण्याची शक्यता (शिवसेना)
  • ग्रामीण भागाशी संबंधित कृषी, सहकार, ग्राम विकास ही खाती प्रत्येकी एका पक्षाला मिळू शकतात

शिवसेनेतील मंत्रिपदाचे संभाव्य दावेदार

शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांना सार्वजनिक बांधकाम खात्याचा कारभार दिला जाण्याची शक्यता आहे. रवींद्र वायकर यांची नगरविकास मंत्रिपदी वर्णी लागू शकते. तर सुभाष देसाई यांना उद्योग, अब्दुल सत्तार यांना अल्पसंख्याक मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याशिवाय उदय सामंत यांना गृहनिर्माण मंत्रिमंडळाचा कारभार कारभार दिला जाण्याची माहिती मिळत आहे.

देवेंद्र फडणवीसांचा शाप फळणार नाही, ‘सामना’तून निशाणा

याव्यतिरिक्त दादा भुसे, अनिल परब, गुलाबराव पाटील, प्रकाश आबिटकर, दिवाकर रावते, दीपक केसरकर, रामदास कदम, बच्चू कडू, अंबादास दानवे या आमदारांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी-काँग्रेसमधून संभाव्य नावं कोणाची?

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची धुरा सोपवली जाण्याची चिन्हं आहेत. तर कळवा मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना वैद्यकीय शिक्षण मंत्रालय सुपूर्द केलं जाण्याची शक्यता आहे.

नवाब मलिक यांना कामगार मंत्रालय मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना महसूल खात्याचा कारभार दिला जाण्याचे संकेत आहेत. याशिवाय विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर, के. सी. पाडवी या काँग्रेस आमदारांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. (Prithviraj Chavan Opposed)