महाराष्ट्रात सर्वात मोठ्या राजकीय समीकरणांची नांदी, मनसेकडून पहिले संकेत

| Updated on: May 30, 2019 | 12:52 PM

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजप्रणित एनडीएने पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारत प्रचंड यश मिळवलं. 300 पार जागा मिळवत एनडीएने केंद्रातील सत्तेवर एकहाती वर्चस्व मिळवलं. दुसरीकडे, देशातील विरोधकांचा पुरता सुपडासाफ झाला. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकांसाठी विरोधकांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. या रणनितींची सुरुवात महाराष्ट्रातून होणार असल्याचे चित्र आहे. कारण दोन दिवसांपासून विरोधकांमधील काँग्रेस, राष्ट्रवादी, […]

महाराष्ट्रात सर्वात मोठ्या राजकीय समीकरणांची नांदी, मनसेकडून पहिले संकेत
Follow us on

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजप्रणित एनडीएने पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारत प्रचंड यश मिळवलं. 300 पार जागा मिळवत एनडीएने केंद्रातील सत्तेवर एकहाती वर्चस्व मिळवलं. दुसरीकडे, देशातील विरोधकांचा पुरता सुपडासाफ झाला. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकांसाठी विरोधकांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. या रणनितींची सुरुवात महाराष्ट्रातून होणार असल्याचे चित्र आहे. कारण दोन दिवसांपासून विरोधकांमधील काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख नेत्यांनी महाराष्ट्रात ताकद बाळगून असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात नवी राजकीय समीरकरणं दिसू शकतात. विरोधकांमधील सर्व गट एकत्र येऊन, विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना-रिपाइं या महायुतीविरोधात लढू शकतात, असे एकंदरीत संकेत विरोधकांच्या गोटातून दिसून लागले आहेत.

वाचा : तिकडे दिल्लीत मोदींचा शपथविधी, इकडे मुंबईत दोन ठाकरेंची भेट

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना परवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी भेट घेतली. काल राज ठाकरे यांनी मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यावर जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर आज काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.

त्यानंतर आज मनसेचे राज्य सरचिटणीस आणि राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या संदीप देशपांडे यांनी ट्वीटरवर म्हटले आहे की, “महाराष्ट्राच्या त्रस्त जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रात पारंपरिक राजकारण सोडून नव्या राजकीय प्रयोगांची गरज आहे.”

संदीप देशपांडे यांच्या ट्वीटमागील अर्थ आणि गेल्या दोन दिवसांपासून राज ठाकरे यांच्या आघाडीतील नेत्यांसोबतच्या भेटीगाठी पाहता, महाराष्ट्रात नव्या आणि मोठ्या राजकीय समीकरणांची नांदीची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी एकही उमेदवार उभा केला नव्हता. मात्र राज ठाकरेंनी ‘मोदी शाह मुक्त भारत’ म्हणत राज्यभर प्रचारसभा घेतल्या आणि एकप्रकारे आघाडीला मतदान करण्याचंच आवाहन केलं. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे आपले उमेदवार उतरवणार आहेत, हे निश्चित. मात्र, ते थेट आणि उघडपणे आघाडीच्या गोटात सामील होतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.