पुण्यात बिघाडीची चिन्हं, राष्ट्रवादीच्या दाव्यानंतर काँग्रेसकडून 50-50 चा प्रस्ताव

| Updated on: Jun 18, 2019 | 9:37 AM

2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी नव्हती. शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर, काँग्रेस-राष्ट्रवादीचीही आघाडी तुटली होती. त्यामुळे सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते.

पुण्यात बिघाडीची चिन्हं, राष्ट्रवादीच्या दाव्यानंतर काँग्रेसकडून 50-50 चा प्रस्ताव
Follow us on

पुणे : विधानसभा निवडणुकीत पुण्यात जागावाटपावरुन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत बिघाडीची शक्यता आहे. कारण पुण्यातील 8 जागांपैकी 6 जागांची मागणी राष्ट्रवादीने केली असताना, आता काँग्रेसनेही जागांवरली आपला दावा सादर केला आहे. आठ पैकी चार जागा लढवण्याची तयारी काँग्रेसची आहे. पुण्यात काँग्रेसने फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्मुला अवलंबण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पुण्यातील जागांवरुन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत दावे-प्रतिदावे सुरु झाले आहेत.

मुंबई काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी पुण्याती 8 पैकी 4 जागांची मागणी केली. यामध्ये शिवाजीनगर, कासबा ,कॅन्टोन्मेंट आणि पर्वती मतदारसंघाचा समावेश आहे. 2014 च्या निवडणुकीमध्ये शिवाजीनगर, कसबा आणि कॅन्टोमेंट मतदारसंघात काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर असल्याचा दावा आहे. तर पर्वती मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर असलेला सेनेचा तत्कालिन उमेदवार काँग्रेसमध्ये असल्यानं पर्वतीवरही काँग्रेसने दावा केला आहे.

राष्ट्रवादीचा 6 जागांवर दावा

दुसरीकडे  राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यातील आठपैकी सहा जागांवर दावा केला आहे. पुण्यातील हडपसर, खडकवासला, पर्वती,वडगाव शेरी,कोथरुड आणि शिवाजीनगर हे सहा मतदारसंघ आपल्याला मिळावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होती.  पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून आले आहेत, तर आठपैकी 6 मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या जागा आपल्याला मिळाव्या अशी मागणी केली. कालच ही माहिती समोर आली. त्यानंतर आता काँग्रेसने आपला दावा केला आहे.

2014 ची निवडणूक

दरम्यान, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी नव्हती. शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर, काँग्रेस-राष्ट्रवादीचीही आघाडी तुटली होती. त्यामुळे सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. पुण्यातील 8 जागांवर सर्व पक्षीय उमेदवार होते. त्यावेळी भाजपने बाजी मारली,  मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार 6 मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर होते, असा राष्ट्रवादीचा दावा आहे.

संबंधित बातम्या 

पुण्यातील 8 पैकी 6 मतदारसंघ आम्हाला द्या, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मागणी