
मनोज गाडेकर, नगर: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून राज्यात असंतोष निर्माण झाल्याची टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी केली होती. या टीकेला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (radhakrishna vikhe patil) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र (maharashtra) नाही. असंतोष तुमच्या मनात आणि पक्षात असल्याची घणाघाती टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. मीडियाशी संवाद साधताना विखे पाटील यांनी ही टीका केली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील आज अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे आले होते. यावेळी नागरी सत्काराच्या कार्यक्रमाला ते उत्तर देत होते. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. असंतोष तुमच्या मनात आणि पक्षात आहे. महाराष्ट्राच्या जनतेत आनंदी आनंद असून जनतेच्या मनातील सरकार आता आलेलं आहे. त्याचेच शल्य आणि असंतोष त्यांच्या मनात असल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
पत्राचाळ प्रकरणात शरद पवारांचा सहभाग असल्याचा आरोप झाल्यानंतर पवारांनी चौकशीत मी जर निर्दोष आढळलो तर सरकार काय करणार ? असं आव्हान दिलंय. यावर जर तुम्ही काही केलं नाही तर धास्ती घेण्याचं कारण नाही. चौकशी यंत्रणेवर अप्रत्यक्ष तुम्ही दबाब आणत असाल तर तो तुमचा गैरसमज असल्याची टीकाही त्यांनी केली.
अनेकदा ईडीवर आणि केंद्रावर आरोप केले जातात. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ईडीला अधिकार दिले आहेत. त्यामुळे जर कोणी ईडीवर आरोप करत असेल तर तो त्यांचा बालिशपणा असल्याची टीका त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव न घेता केली.
महाराष्ट्रात ED आहे …! ते म्हणजे एकनाथराव (E) आणि देवेंद्र (D) सरकार म्हणजेच ईडी सरकार. खरं तर या ईडीला विरोधकांनी घाबरण्याची गरज असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
एकनाथ शिंदेंची खरी शिवसेना आहे आणि त्यांचा दसरा मेळावा बीकेसीला होणार आहे. ज्या शिवसेनेत काही शिल्लक राहीलं नाही, त्यांनी कुठं मेळावा घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. गेली दोन वर्षे महाराष्ट्रात मुख्यमंत्री दिसले नाही. मात्र आता या निमित्ताने किमान शिवसेनेचे नेते दिसायला लागले, अशी टीकाही त्यांनी केली.
तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. मात्र गेल्या अडीच वर्षात राज्य अधोगतीकडे गेले असून आता जनतेच्या मनातील राज्य सरकार आलेले आहे. राज्य कसे प्रगतीकडे जाईल याकडे आमचं लक्ष असून राजकारणात कुणाची एन्ट्री होतेय याकडे आमचे लक्ष असल्याचं ते म्हणाले.