बाळासाहेबांनी हे खपवून घेतले नसते, आव्हाडांच्या वादग्रस्त विधानावर राम कदम संतापले

| Updated on: Jan 20, 2020 | 10:52 PM

हिंदू आपल्या पूर्वजांचे अंत्यसंस्कार कोठे झाले, हे सांगू शकत नाही, मुस्लिम सांगू शकतो. कारण, त्यांचे हक्काचे कब्रस्तान आहे, असं वादग्रस्त वक्तव्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं

बाळासाहेबांनी हे खपवून घेतले नसते, आव्हाडांच्या वादग्रस्त विधानावर राम कदम संतापले
Follow us on

मुंबई : ‘हिंदू आपल्या पूर्वजांचे अंत्यसंस्कार कोठे झाले, हे सांगू शकत नाही, मुस्लिम सांगू शकतो. कारण, त्यांचे हक्काचे कब्रस्तान आहे’, असं वादग्रस्त वक्तव्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं (Jitendra Awhad controversial statement). मात्र, जितेंद्र आव्हाडांच्या या विधानावर भाजप आमदार राम कदम चांगलेच संतापले. “जितेंद्र आव्हाडांचे हे विधान दुर्दैवी असून त्यांनी हे विधान मागे घ्यावे. तसेच, अशा नेत्याचा ठाकरे सरकारने तात्काळ राजीनामा घ्यावा”, अशी मागणी राम कदम यांनी केली आहे. इतकंच नाही तर राम कदम यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला (Ram Kadam On Jitendra Awhad).

“राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाडांनी जे वक्तव्य केलं, ते अतिशय दुर्दैवी आहे. मुस्लिम समाजाला खूश करण्यासाठी त्यांनी जे वक्तव्य केलं, त्यातून केवळ हिंदू धर्म नव्हे, तर मुस्लिम समाजसोडून ज्या-ज्या धर्मामध्ये अंत्यविधी दफनविधीचा होत नाही, त्या धर्मांचा अपमान केला आहे. आव्हाडांनी समस्त हिंदू धर्माची माफी मागितली पाहिजे. वक्तव्य मागे घेतलं पाहिजे.”

 

“हिंदूत्वाची भाषा बोलणारी शिवसेना, उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री दिवसाढवळ्या हिंदूंचा अपमान करतो आणि बाळासाहेब ठाकरेंची हिंदुत्वाची भाषा करणारी शिवसेना गप्पा का? बाळासाहेब जिंवत असते, तर त्यांनी हे खपवून घेतले नसते. अशा नेत्याचा ताबडतोब राजीनामा घेतला पाहिजे”, असं उद्विग्न प्रतिक्रिया राम कदम यांनी दिली.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

या देशातील हिंदू आपल्या आजोबा पणजोबांचे अंत्यसंस्कार कोठे झाले सांगू शकणार नाहीत, पण मुस्लिम हे हक्काने सांगू शकतो. कारण, त्याच्याकडे हक्काचे कब्रस्तान आहे. तो आपल्या आजोबांचे, पणजोबांचे दफन कोणत्या कब्रस्तानात झाले, असे हक्काने सांगू शकतो, असे वक्तव्य राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी 18 जानेवारीला भिवंडी येथे संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने आयोजित जाहीर सभेत केले होते.

पाहा व्हिडीओ :