
Ravindra Chavan : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र भाजपाची धुरा कोणाच्या हाती दिली जाणार, याची सर्वांनाच उत्सुकता लगली होती. आता मात्र ही उत्सुकता संपली आहे. आज (1 जुलै) भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला राज्यात एक कायमस्वरुपी प्रदेशाध्यक्ष मिळावा, अशी भावना व्यक्त केली जाऊ लागली. त्यामुळेच प्रदेशाध्यक्षपदासाठी योग्य चेहऱ्याचा शोध घेतला जाऊ लागला. रविंद्र चव्हाण यांच्याकडे अगोदरपासूनच महाराष्ट्र भाजपाचे कार्यकारी अध्यक्षपद होते. त्यामुळे तेच या पदासाठी योग्य व्यक्ती असल्याचे एकमत भाजपात झाले. ठरल्याप्रमाणे त्यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीसाठी दिल्लीला पाठवण्यात आले होते. या निवड प्रक्रियेत अन्य कोणत्याही नेत्याने अर्ज न केल्यामुळे रवींद्र चव्हाण यांची आज भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
रवींद्र चव्हाण हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाचे सक्रिय नेते आहेत. सर्वप्रथम 2007 साली ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले.नंतर 2009 साली विधानसभा निवडणूक लढवून ते आमदार झाले. त्यानंतर 2014 सालीही त्यांनी दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली. त्यानंतर ते आमदार असताना कल्याण-डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर,ठाणे,पनवेल महापालिकेत भाजपाचा बोलबाला पाहायला मिळाला.
रविंद्र चव्हाण हे पालघरचे पालकमंत्री राहिलेले आहेत. 2019 साली रविंद्र चव्हाण हे तिसऱ्यांदा आमदार झाले. 2021 साली त्यांना मंत्रीपदही देण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे ते मंत्री होते. त्यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणूनही काम केलेले आहे. रविंद्र चव्हाण 2024 साली चौथ्यांदा आमदार म्हणून विधानसभेत गेले.
भाजपा हीच माझी ओळख !
२५ वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या भारतीयत्व जपणाऱ्या विशाल विचारधारेत सामील झालो. आपली विचारधारा विशाल गंगेप्रमाणे पवित्र आणि प्रवाही आहे. ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ हा विचार देणाऱ्या गंगेने मुख्य प्रवाहात मला सामावून घेतले. या विचारधारेने सामाजिक भान… pic.twitter.com/AD1JwGeCyK
— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) July 1, 2025
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी याआधी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे होती. मात्र त्यांच्याकडे महसूलमंत्रिपदाची जबाबदारी आल्यानंतर आता रवींद्र चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.