नगरसेवक ते थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष… रवींद्र चव्हाण यांच्या कारकिर्दीतील हे टप्पे माहीत आहेत काय?

रविंद्र चव्हाण हे आता भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यांची राजकीय कारकीर्द जाणून घेऊयात.

नगरसेवक ते थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष... रवींद्र चव्हाण यांच्या कारकिर्दीतील हे टप्पे माहीत आहेत काय?
Ravindra Chavhan
| Updated on: Jul 01, 2025 | 7:27 PM

भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळाला आहे. रवींद्र चव्हाण हे आता नवे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. रवींद्र चव्हाण हे आधी कार्याध्यक्ष होते, मात्र आता ते राज्यात भाजपचे नेतृत्व करताना दिसणार आहेत. त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची जागा घेतली आहे. रवींद्र चव्हाण नेमके कोण आहेत? त्यांची राजकीय कारकीर्द कशी आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.

रवींद्र चव्हाण यांचा अल्पपरिचय 

रवींद्र चव्हाण यांचा जन्म 20 सप्टेंबर 1970 रोजी झाला. त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. 2002 मध्ये भाजप युवा मोर्चाचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. 2005 मध्ये ते कल्याण डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर 2007 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असतानाही भाजप नगरसेवक असूनही स्थायी समितीचे सभापती झाले.

2009 मध्ये तत्कालीन भाजप आमदार हरिश्चंद्र पाटील यांचे तिकीट कापून रवींद्र चव्हाण यांना भाजपने उमेदवारी दिली आणि त्यांनी तो विश्वास खरा करुन दाखवला. ते 2009 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. यानंतर 2014 मध्ये दुसऱ्यांदा आमदार म्हणून त्यांनी शपथ घेतली.

यानंतर 2015-16 मध्ये कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर, ठाणे, पनवेल, महापालिकेत भाजपचा बोलबाला पाहायला मिळाला. तसेच कर्जत, माथेरान, बदलापूरमध्ये भाजपने चांगले यश मिळवले. त्यामुळे त्यांना राज्यमंत्रीपद मिळाले. तसेच ते रायगड, पालघर पालकमंत्रीही होते. यानतंर 2019 मध्ये तिसऱ्यांदा आमदार झाले. 2021 मध्ये शिंदे भाजप सरकार आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

यानंतर 2021 मध्ये रवींद्र चव्हाणांची कॅबिनेट मंत्री म्हणून निवड करण्यात आली. त्यांच्याकडे पीडब्ल्यूडी खाते होते. त्यांनी सिंधूदुर्गचे पालकमंत्री म्हणूनही कारभार सांभाळला. यानंतर 2024 मध्ये चौथ्यादा डोंबिवलीतून आमदार झाले. आता त्यांच्या गळ्यात महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडली आहे. त्यांच्यावर भाजप पक्षाचा विस्तार करण्यासोबत पक्षशिस्त टिकवून ठेवण्याची जबाबदारी असणार आहे.