Rohini Khadse : ‘नावापुढे नवऱ्याचं नाव आणि..’, रुपाली चाकणकर विरुद्ध रोहिणी खडसेंमध्ये जुंपली

Rohini Khadse : अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर सध्या जळगाव दौऱ्यावर आहेत. त्यांनी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्यावर बोचरी टीका केली. त्याला रोहिणी खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं. सध्या दोन्ही महिला नेत्यांमध्ये वार-प्रतिवार सुरु आहे.

Rohini Khadse : नावापुढे नवऱ्याचं नाव आणि.., रुपाली चाकणकर विरुद्ध रोहिणी खडसेंमध्ये जुंपली
Rohini Khadse vs Rupali chakankar
| Updated on: Sep 20, 2024 | 10:21 AM

“कुणाचं नाव वापरायचं हा मला कायद्याने दिलेला अधिकार आहे. अहो, रूपालीताई मला अभिमान आहे की, मी अशा वडिलांच्या पोटी जन्माला आली, की ज्यांचं नाव मी अभिमानाने सांगू शकते. ताई नावालाही कर्तृत्वान वडील लागतात याचा मला अभिमान आहे” अशा शब्दात रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर पलटवार केलाय. “तुम्ही जळगावत आलात, फक्त रोहिणी खडसेंचा जप न करता महिला अत्याचाराच्या घटनेकडे लक्ष घाला. राजकारण करण्यासाठी महिला आयोगाचे पद तुमच्याकडे दिलेलं नाही” असं रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकरांना सुनावलं.

“महिलांना न्याय देण्यासाठी हे पद तुम्हाला दिलं आहे. जळगावात आल्यापासून तुम्हाला खडसेंशिवाय दुसरं काही दिसत नाही का? तुम्हाला खडसे नावाचा फोबिया झालाय. ज्या कामासाठी तुम्हाला महिला आयोगाचे पद दिले त्यालाच न्याय द्या” असं रोहिणी खडसे म्हणाल्या. ‘राजकारण करायला आयुष्य पडलंय भेटूया पुन्हा’ असं रोहिणी खडसे म्हणाल्या.

‘त्याशिवाय यांना कोणी ओळखते का?’

रूपाली चाकणकर यांनी काल रोहिणी खडसे यांच्यावर जबरी टीका केली होती. “नावापुढे नवऱ्याचं नाव आणि आडनाव लावून मतदारसंघात फिरल्याशिवाय यांना कोणी ओळखते का? तसच वडिलांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना आम्ही शून्य किंमत देतो” अशी टीका केली होती. त्याला दुसऱ्यांदा रोहिणी खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

‘कमेंट एकदा वाचा’

“तुमच्या नेहमीच्या वक्तव्याबाबत खाली येत असलेल्या कमेंट एकदा वाचा. मग तुम्हाला तुमचं अस्तित्व कळेल. ज्यांचं नगरपालिकेत डिपॉझिट जप्त झालंय अशा लोकांचा जनाधारक शिल्लक राहिलेला नाहीय. रूपाली चाकणकरांच्या वक्तव्याला मी फार महत्त्व देत नाही” असं रोहिणी खडसे काल म्हणाल्या होत्या. “रूपाली चाकणकर ह्या शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने सध्या पद भोगत आहेत. शरद पवार साहेबांच्या भरोशावर आतापर्यंत पद यांना मिळत आली आहेत” असं रोहिणी खडसे म्हणाल्या.