“मुंबई आम्हीच जिंकणार, भाजप महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट होणार!”, दसरा मेळाव्याआधी सामनातून ठाकरेंची डरकाळी

| Updated on: Oct 05, 2022 | 9:14 AM

मागच्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणारा दसरा मेळावा अखेर आज होणार आहे. या मेळाव्याआधी शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामनातून हल्लाबोल करण्यात आला आहे. वाचा...

मुंबई आम्हीच जिंकणार, भाजप महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट होणार!, दसरा मेळाव्याआधी सामनातून ठाकरेंची डरकाळी
Follow us on

मुंबई : मागच्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणारा दसरा मेळावा (Saamana Editorial) अखेर आज होणार आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तसंच या सगळ्याला एकनाथ शिंदे काय उत्तर देणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे. या मेळाव्याआधी शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामनातून हल्लाबोल करण्यात आला आहे. “मुंबई आम्हीच जिंकणार, भाजप महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट होणार आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचाच भगवा फडकत राहणार”, असं सामनाच्या आजच्या अग्रलेखात म्हणण्यात आलं आहे.

“आज शिवतीर्थावर विचारांचे सीमोल्लंघन होईल. कोणी कितीही अपशकुन करू द्या, महाराष्ट्रात शिवसेनेचाच भगवा फडकत राहील. आज मुंबईवर शिवसेनेचे राज्य आहे. तुमच्या छाताडावर बसून पुन्हा मुंबई जिंकूच. पुढील निवडणुकीत कमळाबाईंची अशी जिरणार आहे की, भाजप महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट झालेला दिसेल. पुढच्या पिढीला कळणारदेखील नाही की, भाजप नावाचा एक पक्ष महाराष्ट्रात होता व तो महाराष्ट्राच्या मुळावर आला होता”, असं म्हणत सामनातून भाजपला आव्हान देण्यात आलं आहे.

“महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सच्चा शिवसैनिक चालत, धावत, मिळेल त्या वाहनाने शिवतीर्थाकडे निघाला आहे. रणमैदान सज्ज होत आहे. ‘खोके’वाल्यांचा अधर्म या निष्ठेपुढे कसा टिकेल? जेथे धर्म तेथे जय! शिवतीर्थाच्या मैदानावर धर्म आहे! त्यामुळे जय नक्की आहे!”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

“आज विजयादशमी! अतिशय मोठा आनंदाचा आणि मांगल्याचा सण. साडेतीन मुहूर्तांपैकी एक. मात्र या पवित्र मुहूर्ताची निवड काही नतद्रष्टांनी केली आहे ती महाराष्ट्र, मराठी एकजुटीत फूट पाडण्यासाठी. हिंदुत्वाची वज्रमूठ असलेली शिवसेना कमजोर करण्यासाठी काही लोकांनी आजचा मुहूर्त निवडला असला तरी शिवसेना ही काही लेचापेचांची संघटना नाही. शिवसेना म्हणजे महाराष्ट्राची शिवशक्तीच आहे. ही शिवशक्ती गेली छप्पन्न वर्षे शिवतीर्थावर सीमोल्लंघनासाठी उसळत असते. अनेक लाटा आणि कपट-कारस्थानांशी टक्कर देत शिवतीर्थावरील हे सीमोल्लंघन सुरूच राहिले आहे”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.