
Sanjay Raut On Amit Shah : गृहमंत्री अमित शाह यांची पुण्यात काल भव्य सभा पार पडली. या सभेत अमित शाहांसह देवेंद्र फडणवीसांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे. “अमित शाहांनी देवेंद्र फडणवीसांची पहिली चौकशी करा. तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या मागे ईडी लावणार असाल, तरच तुम्हाला भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार आहे”, अशा शब्दात संजय राऊतांनी अमित शाहांवर ताशेरे ओढले.
“अमित शाहांनी काल एक वक्तव्य केलं, त्या वक्तव्यावर तिथे उपस्थित असलेल्या सर्व श्रोत्यांनी टाळ्या वाजवल्या. मला त्या श्रोत्यांची किव येते. इतकी लाचारी, इतका निर्लज्जपणा गुजरातचा एक व्यापारी नेता पुण्यात येतो आणि महाराष्ट्राचा अभिमान असलेले पवार, ठाकरे यांच्यावर अत्यंत घाणरेड्या भाषेत वक्तव्य करुन निघून जातो. हा या महाराष्ट्राचा किंवा मराठी नेत्यांच्या संदर्भात त्यांच्या मनात जो द्वेष आहे, त्या द्वेषाला फुटलेली ही उकळी आहे. शरद पवार यांच्यावर त्या काळात जे भ्रष्टाचाराचे आरोप केले, ते ज्यांच्यामुळे केले ते प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ हे सर्व आज अमित शाहांसोबत बसतात. या सगळ्यांमुळे शरद पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. ते सगळे आता त्यांच्या पक्षात आहेत, हे अमित शाह यांना माहिती नाही का?” असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.
“अमित शाहांच्या बाजूला अशोक चव्हाण बसले होते. त्यांच्यावर खुद्द अमित शाहांनीच आरोप केले होते. याच मोदी सरकारने देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण हा पुरस्कार शरद पवारांना दिला. त्याचे कौतुक मोदींनीही केले. पवारांचे बोट धरुन राजकारणात आलो, असे वक्तव्य करण्यात आले. याचा अर्थ मोदी-शाह यांच्यात काहीतरी भांडण झाल्याचे दिसत आहे. त्यांच्यात काहीतरी मतभेद झाल्याचे दिसत आहे”, असेही संजय राऊत म्हणाले.
“भाजप हा पराभूत झालेल्या मनोवृत्तीतून बोलत आहे. त्यांनी एक मान्य केलं पाहिजे की लोकांनी आपल्याला बहुमतातून अल्पमतात टाकलं आहे. मोदी ३० वर्षे अजून राज्य करतील. ते नॉन बायोलॉजिकल आहेत. ते वरुन आलेले आहेत. आम्ही हिंदू आहेत, आईच्या पोटातून आलो आहोत. ते कसे आले माहित नाही. ते बायोलॅाजिकल नाहीत. आज मोदींचं वय काय, इतकी वैफल्य, निराशा देशातील कोणत्याही राजकारणाकडे मी पाहिलेली नाही. त्यांनी विधानसभेत महाराष्ट्राचे दौरे वारंवार करायला हवेत. विधानसभेत आम्हाला १७५ जागा जिंकू असं वाटत होतं, पण आता १८५ जागा जिंकू, असं वाटत आहे”, असेही वक्तव्य संजय राऊतांनी केले.
“महाराष्ट्र हा गांडू नाही. अमित शाह अशा प्रकारची भाषा करत असतील, तर जोपर्यंत त्यांच्या हातात सत्ता आहे, तोपर्यंत आम्ही पुन्हा तुरूंगात राहायला तयार आहोत. आणीबाणी काय आहे हे तुम्ही दाखवताय. तुम्ही ईडी सीबीआय बाजूला ठेवा. फडणवीसांनी २० आमदार फोडले, असे म्हटलं. यामुळे पहिली चौकशी ही फडणवीसांची करायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस सांगतात की २० आमदार फोडले त्यांना प्रत्येकी ५० कोटी रुपये दिले. देवेंद्र फडणवीसांना अटक करा. कसे फोडले आमदार? किती पैसे आमदारांना दिले? फडणवीस आणि शिंदेंनी पैसे आणले कुठून? जर तुम्ही खरे आहात तर मग अमित शाहांनी पहिली चौकशी देवेंद्र फडणवीसांची करा. तुम्ही यांच्या मागे ईडी लावणार आहात का, तर तुम्हाला भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार आहे”, असाही सल्लाही संजय राऊतांनी दिला.
“अमित शाह या देशाचे गृहमंत्री आहेत हे सांगायला आम्हाला लाज वाटते. गृहमंत्र्याची भाषा कशी असायला पाहिजे. यापूर्वी लालकृष्ण अडवाणी गृहमंत्री होते यांच्या वक्तव्य पाहिले पाहिजे. देशाचे गृहमंत्री कसे नसावे याचं उदाहरण अमित शाह आहेत. कधीकाळी तडीपार का झाले आणि कोणत्या गुन्हात तडीपार झाले हे अमित शाहांनी पहावं, आम्हाला बोलायला लावू नका. तुम्ही गृहमंत्री आहात. तुमचा आम्ही मान राखतो”, असेही संजय राऊत म्हणाले.