Sanjay Raut : राज्यात मिनिटा-मिनिटाला लोकशाहीचा खून; उद्या कळेलच न्यायव्यवस्था किती दबावात आहे, राऊतांचा पुन्हा एकदा टोला

| Updated on: Jul 10, 2022 | 2:50 PM

शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. इथे मिनिटा-मिनिटाला लोकशाहीचा खून होत असल्याचा टोला राऊत यांनी लगावला आहे.

Sanjay Raut : राज्यात मिनिटा-मिनिटाला लोकशाहीचा खून; उद्या कळेलच न्यायव्यवस्था किती दबावात आहे, राऊतांचा पुन्हा एकदा टोला
संजय राऊत
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदार आणि भाजपावर(BJP) निशाणा साधला आहे. कायदेशीर लढाईत सेना कुठेही कमी पडणार नाही. आम्हाला माहीत आहे, कोणावर कसा दबाव आणला जातो ते. कायद्याची पायमल्ली सुरू असून, लोकशाहीचा खून करण्याचा मिनिटा मिनिटाला प्रयत्न होत असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान यावेळी बोलतान संजय राऊत यांनी शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर उद्या 11 जुलैला निकाल आहे. त्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. उद्याच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. लोकशाही (Democracy) आणि न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे की नाही हे उद्या कळेल. आमची न्यायव्यवस्था किती दबावात आहे हे उद्या स्पष्ट होईल असे राऊत यांनी म्हटले आहे. शिवसैनिक कायम आमच्यासोबत असल्याचा दावा देखील यावेळी संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसैनिक शिवसेनेसोबतच

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, शिवसैनिक सदोदित आमच्यासोबत आहे. आम्ही मातोश्रीच्यासोबत आहोत. मातोश्री आमची आई आहे. बाळासाहेब आमची आई आहे. शिवसेना आमची आई आहे. आम्ही आईसोबत गद्दारी करत नाही. बेईमानी करत नाही. लाखो शिवसैनिक आजही मातोश्रीसोबत आहेत. त्यांचे आणि मातोश्रीचे नाते अतूट आहे, त्यामुळे सत्ता असली काय किंवा नसली काय ते मातोश्रीला कधीच सोडणार नसल्याचं राऊत यांनी म्हटले आहे. रोज 15-15 तास बैठका होत असून, प्रत्येक शहरातील शिवसैनिक भेटायला येत आहे. त्यामुळे शिवसेना आहे तिथेच आहे. ही ठाकरेंची शिवसेना असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा

संजय राऊतांसोबतच आदित्य ठाकरे देखील वारंवार शिंदे गटावर निशाणा साधत आहेत. आज पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. ते आपल्या निष्ठा यात्रेदरम्यान बोलत होते. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, मी इथ शिवसैनिकांचे प्रेम घ्यायला आलो आहे. ठाकरे कायमच मैदानात असतात. ज्याच्यावर विश्वास टाकला त्यांनीच पाठित खंजिर खुपसल्याची टीका यावेळी आदित्य ठाकरे यांनी केला आहे.