जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर मराठा आरक्षणाबद्दल सयाजी शिंदे यांचं मोठं वक्तव्य

प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी याठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान नेमकं काय घडलं आणि आरक्षणाच्या बाबतीत आपली भूमिका काय, याविषयी सयाजी शिंदे मोकळेपणे व्यक्त झाले. त्याचप्रमाणे मुंबईत होणाऱ्या आंदोलनात सहभागी होणार का, त्याविषयीही त्यांनी प्रतिक्रिया दिली.

जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर मराठा आरक्षणाबद्दल सयाजी शिंदे यांचं मोठं वक्तव्य
Manoj Jarange Patil and Sayaji Shinde
Image Credit source: Tv9
| Updated on: Jan 03, 2024 | 12:19 PM

जालना : 3 जानेवारी 2024 | मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची आज अभिनेते सयाजी शिंदे यांनी भेट घेतली. जालन्यातील अंतरवाली सराटी याठिकाणी दोघांची भेट झाली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये काही वेळ चर्चादेखील झाली. त्यानंतर माधम्यांशी बोलताना सयाजी शिंदे यांनी मराठा आरक्षणाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. या आरक्षणाच्या मागणीला माझा पाठिंबा आहे, असं ते म्हणाले. यावेळी त्यांना मुंबईतील आंदोलनात सहभागी होणार का, असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

सयाजी शिंदे काय म्हणाले?

“मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे. कोणीतरी आवाज उठवणं गरजेचं होतं आणि तो आवाज जरांगे पाटील यांनी उठवला आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी इथे आलो. आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून नाही पण आमचा त्यांना पाठिंबा असणार आहे,” अशी भूमिका सयाजी शिंदे यांनी स्पष्ट केली. मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या व्यक्तीने ‘न भूतो न भविष्यती’ असं कार्य आरंभलं आहे. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी ही भेट घेतली आहे. माझ्यात आणि जरांगे पाटील यांच्यात काही चर्चा झाली नाही. कारण मी काही अभ्यासक नाही. मी फक्त इथे आलो, त्यांना भेटलो आणि चहापाणी घेतलं, असंही शिंदेंनी स्पष्ट केलं.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत होणाऱ्या आंदोलनात तुम्ही सहभागी होणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, “प्रत्येकाने रस्त्यावर उतरून ओरडलं पाहिजे, असं नसतं. पण त्या मोर्चाला पाठिंबा असणं महत्त्वाचं असतं. सत्याच्या बाजूने लोक नेहमीच उभे राहतात. राज्यभरात 54 लाख मराठा कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे सध्या सर्वांचीच परीक्षा सुरू आहे. जरांगे पाटील या परीक्षेत उत्तम आहेत. त्यामुळे राजकारण्यांचीही परीक्षा सुरू आहे. मराठा समाजातील विद्यार्थी आणि तरुण यांचा विचार केलाच पाहिजे.”

20 जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलक हे मुंबईच्या दिशेने येणार आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी हे आंदोलक अंतरवाली सराटीहून सहा दिवस पायी प्रवास करत मुंबईत येणार आहेत. मुंबईत आल्यानंतर मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू करतील.