पवारांचा आणखी एक नातू रणांगणात, रोहित पवारांनी विधानसभेचं रणशिंग फुंकलं!

| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

पुणे : माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. स्वत: रोहित पवार यांनी यासंदर्भात ‘टीव्ही 9 मराठी’शी बातचीत केली. आपण विधानसभा लढण्यासाठी इच्छुक असून, अद्याप मतदारसंघ ठरला नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. रोहित पवार हे सध्या पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीकडून बारामतीचं […]

पवारांचा आणखी एक नातू रणांगणात, रोहित पवारांनी विधानसभेचं रणशिंग फुंकलं!
Follow us on

पुणे : माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. स्वत: रोहित पवार यांनी यासंदर्भात ‘टीव्ही 9 मराठी’शी बातचीत केली. आपण विधानसभा लढण्यासाठी इच्छुक असून, अद्याप मतदारसंघ ठरला नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

रोहित पवार हे सध्या पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीकडून बारामतीचं प्रतिनिधित्व करतात. पवार कुटुंबातील असल्याने मोठं राजकीय वलय त्यांना आहे. मात्र, रोहित पवार कुठल्या मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरणार, याची उत्सुकता आता राजकीय वर्तुळात शिगेला पोहोचली आहे.

तसेच, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 23 जागा मिळतील, असा अंदाज रोहित पवार यांनी वर्तवला आहे.

राज्यात दुष्काळ भयानक परिस्थिती आहे. पुण्यात पाण्याचं योग्य नियोजन नाही. नियोजन अभावी पाणी टंचाई आहे, असे म्हणत रोहित पवार पुढे म्हणाले, “जलयुक्त शिवार अभियानाचं यश दाखवण्यासाठी जामखेडला गरज असताना कमी टँकरनं पाणी दिलं जात आहे.”

कोण आहेत रोहित पवार?

रोहित पवार हे राजेंद्र पवार यांचे सुपुत्र आहेत. राजेंद्र पवार म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चुलत बंधू. राजेंद्र पवार यांचे वडील पद्मश्री आप्पासाहेब पवार हे देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे बंधू. राजकारणात रोहित पवार यांची ओळख शरद पवारांच्या नावाने होणे सहाजिक आहे. मात्र, पवारांच्या नावासोबत येणारी भलीमोठी जाबाबदारीही पेलण्याची ताकद रोहित पवारांमध्ये दिसून येते. शरद पवारांकडे जे शेतीविषयक अफाट ज्ञान आहे, त्याची चुणूक रोहित पवारांमध्ये दिसून येते.

वाचा : रोहित राजेंद्र पवार… पवार घराण्यातील नव्या पिढीचा शिलेदार नेमका कोण?

वडिलांसोबत व्यवसायात उतरलेल्या रोहित पवारांनी पुढे आजोबा शरद पवार आणि काका अजित पवार यांच्या पावलावर पाऊल टाकत, राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिरसुफळ गटातून रोहित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढलवी आणि राज्यात दुसऱ्या, तर पुणे जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाच्या विक्रमी मताधिक्क्यांनी ते निवडून आले. एकंदरीत राजकारणातील प्रवेशही मोठ्या दिमाखात झाला. सध्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून विविध कामांचा धडाका त्यांनी सुरु केला आहे. या कामांची सोशल मीडियासह अनेक ठिकाणी चर्चा सुरु असते.

रोहित पवार सध्या भूषवत असलेली पदं :

  1. मुख्य कार्यकारी अधिकारी, बारामती अॅग्रो लिमिटेड
    2. अध्यक्ष, इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (आतापर्यंतचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून नोंद)
    3. उपाध्यक्ष, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन
    4. संचालक, आयएसईसी
    5. नियमक मंडळ सदस्य, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट
    6. कार्यकारी सल्लागार समिती सदस्य, इंडियन पोल्ट्री इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ इंडिया

VIDEO : रोहित पवार यांच्याशी बातचीत