राज ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही – शरद पवार

| Updated on: Feb 11, 2020 | 3:52 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली आहे (Sharad pawar slams Raj Thackeray).

राज ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही - शरद पवार
Follow us on

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली (Sharad pawar slams Raj Thackeray).

“काही लोक राज ठाकरे यांचं भाषण ऐकायला येतात. तर काही राज ठाकरेंना पाहायला येतात. त्यामुळे राज ठाकरे यांच्या भाषणाला गर्दी होते”, असा चिमटा शरद पवार यांनी काढला. शरद पवारांच्या या टीकेला मनसेकडून काय उत्तर येतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात राज ठाकरे यांनी 9 फेब्रुवारीला मुंबईत मोर्चा काढला होता. या मोर्चात नाशिक, पुणे आणि राज्यभरातील मनसैनिक सहभागी झाले होते. मोर्चानंतर आझाद मैदान येथे राज ठाकरेंची सभा झाली होती. या सभेलाही प्रचंड गर्दी दिसली होती. मात्र, यावरुन शरद पवार यांनी मनसेवर निशाणा साधला (Sharad pawar slams Raj Thackeray).

लोकसभा निवडणुकीवेळी राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चांगले संबंध असल्याचे निदर्शणास आले होते. राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीवेळी ‘लाव रे तो व्हिडीओ…’ म्हणत राज्यभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रचार केला होता. त्यांच्या या प्रचाराला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी समर्थन केलं होते.

याशिवाय महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवेळीदेखील शरद पवार आणि राज ठाकरे यांची भेट झाल्याची माहिती समोर आली होती. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादी आणि मनसे यांच्यातील जवळीक वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र, त्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या प्रयत्नाने शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले.