महाराष्ट्रातील ‘या’ बड्या नेत्याचं अजित पवार यांच्याबद्दल मोठं विधान, राजकीय चर्चांना उधाण

शिवसेनेच्या बड्या नेत्याने बारामतीत जाऊन अजित पवार यांच्याबद्दल मोठं विधान केलं आहे. विशेष म्हणजे सध्या अजित पवार यांच्याबद्दल राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. असं असताना शिवसेना नेत्याने अशाप्रकारचं मोठं विधान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महाराष्ट्रातील या बड्या नेत्याचं अजित पवार यांच्याबद्दल मोठं विधान, राजकीय चर्चांना उधाण
ajit pawar
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 15, 2023 | 9:53 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल शिवसेनेचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी मोठं विधान केलं आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सध्या अजित पवार यांच्याबद्दल वारंवार उलटसुलट चर्चांना उधाण येत आहे. भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन अजित पवार यांच्यावर दबाव निर्माण करु शकतं. त्यातून अजित पवार यांना आपल्यासोबत येण्यास सांगितलं जाऊ शकतं, अशा चर्चा सुरु आहेत. विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्यातलं सध्याचं सरकार कोसळल्यास भाजपचा अजित पवारांसोबत सरकार स्थापन करण्याचा प्लॅन बी असल्याचा खळबळजनक दावा केलाय. त्यानंतर आता विजय शिवतारे यांचं विधान समोर आलं आहे.

विजय शिवतारे आज बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अजित पवारांच्या भाजप समर्थनावर प्रतिक्रिया दिली. अजित पवारांनी आम्हाला सपोर्ट केल्यानंतर पुरंदरच काय तर महाराष्ट्राचा राजकारण सोप्प होईल, असं मोठं विधान शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी केलं. चांगले लोक एकत्र आल्यावर देशाच्या आणि राज्याच्या हिताच्या दृष्टीने चांगले दिवस नक्कीच येतील, असं ते म्हणाले.

अजित पवार वज्रमूठ सभेत हजर राहणार की नाही?

अजित पवार यांच्याबद्दल गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने उलटसुलट चर्चा सुरु आहेत. विशेष म्हणजे ते काही दिवसांपूर्वी अचानक नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर ते दुसऱ्या दिवशी माध्यमांसमोर आले होते. या दरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री, ईव्हीएमचा मुद्द्यासह काही मुद्द्यांवर महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांच्या विरोधात भूमिका मांडली होती. त्यामुळे अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीती नागपुरात उद्या दुसरी वज्रमूठ सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला अजित पवार उपस्थित राहणार नाहीत, अशी चर्चा सुरु आहे.

असं असताना अजित पवार खरंच सभेला उपस्थित राहणार की नाहीत? याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार नागपूरच्या वज्रमुठ सभेला उपस्थित राहणार आहेत. अजित पवार उद्या सकाळी मुंबईहून नागपूरकडे रवाना होणार आहेत, अशी माहिती आता समोर आली आहे. विशेष म्हणजे पवार नागपूरला वज्रमूठ सभेसाठी जाणार की नाही? याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. अखेर अजित पवार नागपूरला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.