Sanjay Raut : सुडाचं राजकारण आता तरी थांबेल ही अपेक्षा; संजय राऊतांचा भाजपला टोला

| Updated on: Jun 30, 2022 | 4:11 PM

Sanjay Raut : भाजपला सत्ता स्थापन करण्यात कसली अडचण? एक मोठा पक्ष त्यांनी फोडला. इतर पक्षात सुद्धा त्यामुळे चलबिचल आहे. अस्वस्थता आहे. अशा प्रकारे सत्ता स्थापन करण्याची त्याची इच्छा पूर्ण झाली. पण राजाकराणात या गोष्टी मान्य केल्या पाहिजे, होत असतात.

Sanjay Raut : सुडाचं राजकारण आता तरी थांबेल ही अपेक्षा; संजय राऊतांचा भाजपला टोला
संजय राऊत
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटायला गेले आहेत. हे दोन्ही नेते राज्यपालांकडे सत्ता स्थापनेदा दावा करणार आहेत. त्यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोणत्या परिस्थितीत सत्ता परिवर्तन होतंय महाराष्ट्राने पाहिलं. महाराष्ट्रात एक नवीन राज्य येत आहे. ते पुन्हा येत आहेत, आपल्या सर्वांचे मित्रं. नवीन मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्याची आपली संस्कृती आणि परंपरा आहे. त्यानुसार शुभेच्छा देतो. हे राज्य खूप मोठं आहे हे त्यांना माहीत आहे. या राज्यावर संस्कार आहे. राज्यात सुडाच्या राजकारणाचे पायंडे गेल्या पाच सात वर्षात पाडण्यात आले. ते आता थांबतील एवढी अपेक्षा आहे. जो कालखंड मिळाला तो महाराष्ट्राच्या हितासाठी लावा. राजकारण, सत्ताकारण थोडं बाजूला ठेवा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपला टोले लगावले. भाजपला सत्ता स्थापन करण्यात कसली अडचण? एक मोठा पक्ष त्यांनी फोडला. इतर पक्षात सुद्धा त्यामुळे चलबिचल आहे. अस्वस्थता आहे. अशा प्रकारे सत्ता स्थापन करण्याची त्याची इच्छा पूर्ण झाली. पण राजाकराणात या गोष्टी मान्य केल्या पाहिजे, होत असतात. आम्ही त्या करू शकलो नाही म्हणून सत्ता गमावली, असं राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

शिंदे शिवसेनेत नाही

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्याची चर्चा आहे, असं त्यांना सांगण्यात आलं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. एक शिवसैनिक मुख्यमंत्री झाला तर पाहू काय होतं ते. पण या क्षणी ते शिवसेनेत नाही, असं मला वाटतं, असं त्यांनी सांगितलं.

ते मला माहीत नाही

शिंदे गटाच्या प्रतोदांनी व्हीप काढला आहे. हा व्हीप शिवसेनेच्या आमदारांना लागू असणार असल्याचं सांगितलं जातं. याबाबत राऊत यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली. त्यावर, या तांत्रिक बाबी मला माहीत नाही. सुनील प्रभू आणि अन्य कायदेशीर बाबी पाहणारे आमचे नेते ते पाहत आहेत. तेच तुम्हाला त्यावर अधिक सांगू शकतील, असं राऊत म्हणाले.

दहा दिवसानंतर शिंदे मुंबईत

एकनाथ शिंदे यांनी 51 आमदारांसह बंड केलं होतं. 20 जून रोजी विधान परिषदेची निवडणूक पार पडली. त्या दिवशीच्या संध्याकाळीच शिंदे आमदारांना घेऊन सुरतला गेले. तिथे दोन दिवस राहून गुवाहाटीला गेले. त्यानंतर काल ते बंडखोरांना घेऊन गोव्याला आले. आता तब्बल दहा दिवसानंतर ते आज मुंबईत आले. झेड दर्जाच्या सुरक्षेत ते मुंबईत आले आणि थेट सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांना भेटले. त्यानंतर दोघेही नेते आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटण्यासाठी आले आहेत.