शिवसेनेचे महत्त्वाचे नेते मुंबईकडे रवाना, राष्ट्रीय कार्यकारिणीची दुपारी बैठक, शिंदेसेनेचा निर्णय होणार!

| Updated on: Jun 25, 2022 | 10:05 AM

आम्हीच शिवसेना असे म्हणून पुढचा प्रस्ताव देऊ पाहणाऱ्या एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेते म्हणून अनेक अधिकार कापले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जवळपास 51पेक्षा जास्त आमदारांचं पाठबळ घेऊन भाजपसोबत चूल मांडण्याच्या तयारीत असलेल्या एकनाथ शिंदेंसाठी पुढची लढाई म्हणावी तेवढी सोपी ठरणार नाही.

शिवसेनेचे महत्त्वाचे नेते मुंबईकडे रवाना, राष्ट्रीय कार्यकारिणीची दुपारी बैठक, शिंदेसेनेचा निर्णय होणार!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः शिंदेसेनेच्या बंडखोरीमुळे खोळंबलेल्या आघाडी सरकारला आज काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार आहेत. विशेषतः शिवसेना आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. शिवसेनेतून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या सोबतचे आमदारही आज एक ठोस निर्णय घेऊन पुढे येतील, अशी माहिती गुवाहटीतील सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदेंचा गट हीच शिवसेना (Shiv Sena) असा दावा करणारे एक पत्र आज शिंदे गटाकडून राज्यपालांना देण्यात येईल. तशी तयारीही शिंदेंकडून सुरु करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तर इकडे शिवसेना भवनात शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. यासाठी महत्त्वाचे शिवसेना नेते आता मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.

भास्कर जाधव मुंबईच्या दिशेने…

शिवसेनेचे वरिष्ठ नेते भास्कर जाधवदेखील शिवसेनेच्या बैठकीसाठी मुंबईच्या दिशेने रवाला झाले आहेत. काल भास्कर जाधव मुंबईतून अचानक गायब झाल्यामुळे ते गुवाहटीच्या दिशेने गेल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र एकनाथ शिंदेंनी या वृत्ताला दुजोरा दिला नाही. अखेर भास्कर जाधव हे त्यांच्या भावाच्या शस्त्रक्रियेसाठी काल चिपळूणला गेले असल्याची माहिती पुढे आली. आज सकाळीच चिपळूणकडून भास्कर जाधव मुंबईकडे रवाना झाल्याचं कळलंय.

शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक

आज दुपारी एक वाजता शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्याकारिणीची महत्त्वाची बैठक शिवसेना भवनात आयोजित करण्यातल आली आहे. या बैठकीत शिवसेनेच्या घटनेत महत्त्वाचे बदल केले जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांना नेतेपदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय या बैठकीत होऊ शकतो. आम्हीच शिवसेना असे म्हणून पुढचा प्रस्ताव देऊ पाहणाऱ्या एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेते म्हणून अनेक अधिकार कापले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जवळपास 51पेक्षा जास्त आमदारांचं पाठबळ घेऊन भाजपसोबत चूल मांडण्याच्या तयारीत असलेल्या एकनाथ शिंदेंसाठी पुढची लढाई म्हणावी तेवढी सोपी ठरणार नाही.

शिंदे गटाची आज पत्रकार परिषद

दरम्यान, गुवाहटीतील एकनाथ शिंदे गटातर्फे आज पत्रकार परिषद घेतली जाण्याची शक्यता आहे. कालपासून येथील आमदारांच्या बैठकांवर बैठका सुरु आहेत. नेमकी कोणती रणनिती घेऊन महाराष्ट्रात पाऊल ठेवायचं, यावर विचारमंथन आणि कायद्यांचा अभ्यास सुरु आहे. आज या प्रक्रियेचा पुढचा टप्पा गाठला जाऊन एकनाथ शिंदे गट राज्यपालांकडे दोन तृतीयांश आमदारांच्या पाठिंब्यानं पक्षावर दावा ठोकण्यासंदर्भात पत्र देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.