Eknath Shinde : राज ठाकरेंना सोबत घेण्यासासाठी पडद्यामागून एकनाथ शिंदेंची मोठी खेळी

Eknath Shinde : सध्या ठाकरे बंधुंच्या युतीची चर्चा सुरु आहे. पण पडद्यामागून एकनाथ शिंदे मोठी खेळी करु शकतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबई महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते. मुंबई जिंकण्यासाठी भाजप, शिवसेना आणि उद्धव ठाकरे गट आपली सगळी शक्ती पणाला लावणार यात कुठली शंका नाही.

Eknath Shinde : राज ठाकरेंना सोबत घेण्यासासाठी पडद्यामागून एकनाथ शिंदेंची मोठी खेळी
एकनाथ शिंदे, राज ठाकरे (संग्रहित फोटो)
| Updated on: Jun 19, 2025 | 11:08 AM

पुढच्या काही महिन्यात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि नागपूर या महापालिका निवडणुका जास्त महत्त्वाच्या आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते. मुंबई जिंकण्यासाठी भाजप, शिवसेना, मनसे आणि उद्धव ठाकरे गटाची जोरदार तयारी सुरु आहे. मुंबई महापालिकेत गेल्या कित्येक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता होती. पण शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर दोन्ही पक्ष पहिल्यांदा महापालिका निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. अधिकृत शिवसेना एकनाथ शिंदेंकडे आहे. मुंबई महापालिका निवडणूक उद्धव ठाकरे गटासाठी एकप्रकारे अस्तित्वाची लढाई असू शकते. कारण मागच्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे राज्यभरात 57 आमदार निवडून आले. उद्धव ठाकरे गटाला फक्त 20 जागांवर समाधान मानावं लागलं.

या महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने सध्या एकही आमदार, खासदार नसलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला प्रचंड महत्त्व प्राप्त झालं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीआधी मनसेशी युती करण्यासाठी भाजप, शिवसेना आणि उद्धव ठाकरे गट प्रचंड आग्रही आहेत. महापालिका निवडणूक छोट्या-छोट्या प्रभागात होते. तिथे काहीशे मतांच्या फरकाने उमेदवाराचा जय-पराजय होतो. अशावेळी मनसेची मत निर्णायक ठरु शकतात. हे महायुती आणि महाविकास आघाडी दोघांना चांगलं माहित आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या मनसेला सोबत घेण्यासाठी दोन्ही बाजूंकडून प्रयत्न सुरु आहेत.

उद्धव ठाकरे सकारात्मक

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं, अशी दोन्ही पक्षातील नेते, कार्यकर्त्यांची इच्छा आहे. उद्धव ठाकरे गट या युतीसाठी आग्रही आहे. त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देत आहे. उद्धव ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात गळती लागलीय. त्यामुळे एकगठ्ठा मराठी मत टिकवण्यासाठी त्यांना राज ठाकरेंची साथ हवी आहे. मनसेला सुद्धा मागच्या दहा वर्षात काही खास करता आलेलं नाही. त्यांचाही जनाधार घटला आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाला सुद्धा अशा संजीवनी ठरणाऱ्या युतीची गरज आहे.

एकनाथ शिंदेंचा प्लान काय?

मनसे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास नुकसान होऊ शकते. म्हणून शिवसेनेचे सुद्धा राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंना स्नेहभोजनासाठी निमंत्रित करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. यात उदय सामंतांची भूमिका महत्त्वाची असेल. राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या सुद्धा हालाचाली सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे.