राणेंच्या ‘अरे’ला ‘कारे’ने प्रत्युत्तर देणारा शिवसेना नेता, जाणून घ्या विनायक राऊतांचा राजकीय प्रवास

| Updated on: Aug 15, 2021 | 7:02 AM

Vinayak Raut | कोकणातील खासदार असल्यामुळे राणे कुटुंबीयांच्या टीकेला एकहाती प्रत्युत्तर देण्याची कामगिरीही विनायक राऊत हे वेळोवेळी चोखपणे पार पाडताना दिसतात. एकूणच शिवसेनेच्या लोकसभेतील अन्य खासदारांच्या तुलनेत विनायक राऊत यांची वक्तव्ये नेहमीच लक्ष वेधून घेताना दिसतात.

राणेंच्या अरेला कारेने प्रत्युत्तर देणारा शिवसेना नेता, जाणून घ्या विनायक राऊतांचा राजकीय प्रवास
विनायक राऊत, शिवेसना खासदार
Follow us on

मुंबई: शिवसेनेच्या लोकसभेतील खासदारांमध्ये सातत्याने चर्चेत असणाऱ्या नेत्यांमध्ये विनायक राऊत यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. संजय राऊत आणि अरविंद सावंत यांच्यापाठोपाठ पक्षाची बाजू आक्रमकपणे मांडण्याची भूमिका विनायक राऊत नित्यनियमाने बजावत असतात. त्यामध्ये कोकणातील खासदार असल्यामुळे राणे कुटुंबीयांच्या टीकेला एकहाती प्रत्युत्तर देण्याची कामगिरीही विनायक राऊत हे वेळोवेळी चोखपणे पार पाडताना दिसतात. एकूणच शिवसेनेच्या लोकसभेतील अन्य खासदारांच्या तुलनेत विनायक राऊत यांची वक्तव्ये नेहमीच लक्ष वेधून घेताना दिसतात.

शिवसेनेच्या जुन्या फळीतील नेते असणाऱ्या विनायक राऊत यांनी अजूनही पक्षातील आपले स्थान टिकवून ठेवले आहे. भाजप नेतृत्त्वाने कोकणातील शिवसेनेचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी नारायण राणे यांना बळ दिल्याने आगामी काळात विनायक राऊत यांनी भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. राणे कुटुंबीयांना थेटपणे अंगावर घेणाऱ्या शिवसेनेतील मोजक्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. राणे कुटुंबीयांच्या ‘अरे’ला ‘कारे’ करण्याची क्षमता असल्यामुळे विनायक राऊत यांचा शिवसेनेतील प्रमुख नेत्यांमध्ये समावेश आहे.

कोण आहेत विनायक राऊत?

विनायक राऊत यांचा जन्म 15 मार्च 1954 रोजी झाला. मुंबईतील कोणत्याही चाकरमान्याप्रमाणे त्यांची नाळ सुरुवातीपासून सिंधुदुर्गातील आपल्या गावाशी जोडली गेली होती. विनायक राऊत यांचे एम.ए. पर्यंत शिक्षण झाले आहे. राऊत मुंबई व कोकणात दीर्घकाळ सक्रिय राजकारणात प्रभावीपणे कार्यरत असल्यामुळे त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. राऊत यांचे कुटुंब राजकारणात सक्रिय नाही. मुंबईत वास्तव्याला असले तरी कोकणशी नाळ जुळलेली आहे.

विनायक राऊत यांच्या पत्नी शामल राऊत आणि मुलगा गितेश राऊत हेदेखील राजकारणात सक्रिय आहेत. 1992 मध्ये शामल राऊत मुंबई महापालिकेत नगरसेविका होत्या. त्यानंतर त्या राजकारणात फारशा सक्रिय नसल्या तरी शिवसेनेत संघटनात्मक स्तरावर त्या बऱ्यापैकी कार्यरत असतात. तर गितेश राऊत हेदेखील शिवसेनेत सक्रिय आहेत.

विनायक राऊत यांची राजकीय कारकीर्द

शिवसेनेच्या जुन्या फळीतील नेत्यांपैकी एक असणाऱ्या विनायक राऊत यांनी मुंबई महानगरपालिकेतून राजकीय कारकिर्दीला प्रारंभ केला. 1985 मध्ये महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. 1992 पर्यंत विनायक राऊत पालिकेत होते. 1999 साली विनायक राऊत विलेपार्ले मतदारसंघातून काँग्रेसच्या अशोक जाधव यांचा पराभव करुन विधानसभेवर निवडून गेले. तेव्हापासून विनायक राऊत सातत्याने शिवसेनेच्या प्रमुख मंडळींमधील स्थान टिकवून आहेत. 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात काँग्रेस नेते निलेश राणे यांचा दीड लाखांच्या मताधिक्याने पराभव केला. तर 2019 मध्ये विनायक राऊत पुन्हा लोकसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर विनायक राऊत यांनी लोकसभेतील शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली होती.

राणे कुटुंबीयांना तोडीस तोड प्रत्युत्तर देणारा नेता

विनायक राऊत यांचा मुंबई आणि कोकणात दांडगा जनसंपर्क आहे. गणपती, उन्हाळी सुटी व यात्रेच्या निमित्ताने विनायक राऊत आपल्या गावकऱ्यांच्या संपर्कात असतात. त्यामुळे कोकण पट्ट्यातही विनायक राऊत यांना मानणारा मोठा वर्ग आहे. कोकणात राणे कुटुंबीय आणि शिवसेना यांच्यात सातत्याने संघर्ष सुरु असतो. नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांकडून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर सातत्याने जहरी टीका केली जाते. या टीकेला तोडीस तोड प्रत्युत्तर देणाऱ्या नेत्यांमध्ये विनायक राऊत यांचा समावेश आहे.