Smita Thackeray : उद्धव-राज यांच्या एकत्र येण्यावर पहिल्यांदाच स्मिता ठाकरेंच भाष्य

Smita Thackeray : स्मिता ठाकरे आज राजकारणात सक्रीय नसल्या तरी संपूर्ण महाराष्ट्राला हे नाव परिचित आहे. स्मिता ठाकरे या दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सूनबाई आहेत.ठाकरे कुटुंबातील हे एक मोठ नाव आहे. स्मिता ठाकरे यांनी आता उद्धव आणि राज ठाकरेंच्या एकत्र येण्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Smita Thackeray : उद्धव-राज यांच्या एकत्र येण्यावर पहिल्यांदाच स्मिता ठाकरेंच भाष्य
Smita Thackeray-Raj-uddhav
| Updated on: Sep 16, 2025 | 9:19 AM

महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन ठाकरे बंधु एकत्र आले आहेत. मागच्या दोन दशकातील राजकीय मतभेद बाजूला ठेऊन उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. पुढच्या काही महिन्यात मुंबईसह अन्य महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढवू शकतात. मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युती होण्याची दाट शक्यता आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन झाल्याच दिसत आहे. मराठीच्या मुद्यावरुन दोन्ही ठाकरे एकत्र येणार आहेत. कारण सध्याच्या राजकीय परिस्थितीत अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र येण्यावाचून दोन्ही ठाकरेंकडे पर्याय नाहीय. विधानसभा निवडणुकीत मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मोठी घसरण झाली. दोघांचा जनाधार घटल्याच दिसलं. त्यामुळे आगामी मुंबई महानगर पालिकेची निवडणूक दोन्ही बंधुंसाठी महत्त्वाची आहे.

उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा असतानाच आता स्मिता ठाकरे यांनी पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली आहे. स्मिता ठाकरे या दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सूनबाई आहेत. स्मिता ठाकरे हे नाव राजकारणापेक्षा बॉलिवूड वर्तुळात जास्त चर्चेत असतं. स्मिता ठाकरे यांनी काही चित्रपटांची सुद्धा निर्मिती केली आहे. त्यांनी उद्धव आणि राज ठाकरेंच्या एकत्र येण्यावर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. “बाळासाहेब असताना ठाकरे बंधु एकत्र आले असते तर साहेबांना आनंद झाला असता. राज-उद्धव एकत्र आले, याचा कुटुंब म्हणून आनंद आहे” असं स्मिता ठाकरे म्हणाल्या.

राजकारणात याचा किती परिणाम होईल?

“दोन बंधु एकत्र आले तर कुटुंबातील कुठल्याही सदस्यालाच आनंदच होईल. आमचे सासू-सासरे असो किंवा कुठल्याही कुटुंबप्रमुखाला वाटतं की, आपलं कुटुंब एकत्र राहिलं पाहिजे. साहेब असते तर त्यांना आनंद झाला असता. साहेब असताना एकत्र आले असते तर चांगलं झालं असतं. त्यांना आंनंद झाला असता” असं स्मिता ठाकरे म्हणाल्या. राजकारणात याचा किती परिणाम होईल? यावर त्या म्हणाल्या की, ‘राजकारणाशी मी संबंधित नाहीय. त्यामुळे या टिप्पणीबद्दल बोलण्याचा अधिकार नाहीय’