Satej Patil vs Dhananjay Mahadik : सतेज पाटील-धनंजय महाडिकांच्या हाडवैरावर चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

| Updated on: Aug 29, 2021 | 8:55 AM

डी. वाय. पाटील यांचे सुपुत्र सतेज पाटील आणि धनंजय महाडिक (Satej Patil vs Dhananjay Mahadik) हे राजकारणातील कट्टर शत्रू  आहेत. सतेज पाटील काँग्रेसमध्ये आहेत. तर धनंजय महाडिक यांनी शिवसेनेतून, राष्ट्रवादीत आणि आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हे दोन्ही नेते एकमेकांचे हाडवैरी आहेत.

Satej Patil vs Dhananjay Mahadik : सतेज पाटील-धनंजय महाडिकांच्या हाडवैरावर चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य
सतेज पाटील-धनंजय महाडिक
Follow us on

कोल्हापूर : कोल्हापूरसह राज्यभरात एकमेकांचे हाडवैरी म्हणून गृहराज्य मंत्री सतेज पाटील (Satej Patil) आणि भाजप नेते, माजी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांची ओळख आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीपासून (Vidhan sabha election) या दोन्ही नेत्यांचा टोकाचा विरोध राज्याने पाहिला आहे. मात्र आता या दोन्ही कट्टर विरोधकांबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सतेज पाटील – धनंजय महाडिक यांना काहीजण जाणीवपूर्वक एकत्र येऊ देत नाहीत, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. ते कोल्हापुरात बोलत होते.

दोघांचे वाद झाल्याशिवाय आपलं घर चालणार नाही, अशी काहींची भावना आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. या दोघांमधील वाद मिटू नये यासाठी यंत्रणाही कार्यरत असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. एका कार्यक्रमादरम्यान धनंजय महाडिक यांच्यासमोरच चंद्रकांत पाटील बोलत होते.

सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांचं वैर नेमकं काय?

डी. वाय. पाटील यांचे सुपुत्र सतेज पाटील आणि धनंजय महाडिक हे राजकारणातील कट्टर शत्रू  आहेत. सतेज पाटील काँग्रेसमध्ये आहेत. तर धनंजय महाडिक यांनी शिवसेनेतून, राष्ट्रवादीत आणि आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हे दोन्ही नेते एकमेकांचे हाडवैरी असले तरी  2014 च्या लोकसभा निवडणुकीत हे शत्रूत्व शमलं होतं.  2014 च्या लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांचा पाठिंबा मागितला होता. त्यानंतर सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांच्यासोबतचं वैर विसरुन, त्यांना निवडून आणण्याची शपथ घेतली होती. इतकंच नाही तर मोदी लाटेत धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीचे खासदार म्हणून निवडूनही आले होते. सतेज पाटलांच्या पाठिंब्यामुळे धनंजय महाडिक निवडून आले.

मात्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटली. त्यामुळे सतेज पाटील यांच्याविरोधात भाजपकडून धनंजय महाडिकांचा चुलत भाऊ आणि महादेवराव महाडिकांचे सुपुत्र अमल महाडिक उभे राहिले. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात काँटे की लढाई झाली. या निवडणुकीत सतेज पाटील यांना हरवण्यासाठी धनंजय महाडिक यांनी प्रचंड जोर लावला. त्याचा परिणाम म्हणून तत्कालिन गृहराज्यमंत्री असलेले सतेज पाटील यांचा पराभव झाला. त्यामुळे बंटी-मुन्ना पुन्हा एकदा कट्टर शत्रू बनले. लोकसभा निवडणुकीत मदत करुनही धनंजय महाडिक यांनी विधानसभा निवडणुकीत धोकेबाजी केल्याचा आरोप सतेज पाटील यांचा आहे.

याशिवाय काँग्रेसचे विधानपरिषदेचे तत्कालीन आमदार असलेले महादेवराव महाडिक यांनीही काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार न करता, निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेलेल्या मुलाचा प्रचार करुन, सतेज पाटील यांचा पराभव केला.

या सर्वांचा वचपा सतेज पाटील यांनी 2015 मध्ये झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत काढला. सतेज पाटील यांनी महादेवराव महाडिक यांचा पराभव केला. तेव्हापासून महाडिक विरुद्ध बंटी असा सामना कोल्हापुरात सातत्याने रंगला आहे. मग ती जिल्हा परिषद निवडणूक असो, महापालिका निवडणूक असो, गोकुळ दूधसंघ निवडणूक असो वा साखर कारखान्याची निवडणूक असो, सर्व ठिकाणी मुन्ना विरुद्ध बंटी असा सामना पाहायला मिळतो.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत महाडिकांचा पराभव 

लोकसभा निवडणुकीला शिवसेनेकडून संजय मंडलिक विरुद्ध राष्ट्रवादीकडून धनंजय महाडिक अशी लढत झाली. मात्र काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी त्यांना मदत करण्यास थेट नकार दिला. सतेज पाटील यांनी शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना विजयी करण्याचा आणि धनंजय महाडिक यांना पाडण्याचा विडा उचलला होता. त्यामुळे सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात ठिकठिकाणी ‘आमचं ठरलंय’ असे बोर्ड लावले होते. सतेज पाटील यांनी आपली ताकद संजय मंडलिक यांच्या पाठिशी लावली आणि त्यांना जिंकून आणलं.

संबंधित बातम्या

वेळ नेहमीच अनुकूल नसते, सतेज पाटलांचं ‘आमचं ठरलंय’ पवारांच्या जिव्हारी    

‘आमचं ठरलंय’ वरुन मुन्ना-बंटी मतदानादिवशीही आमने-सामने

मुन्नांनी आमची मैत्री पाहिली, आता दुश्मनी पाहू नये : चंद्रकांत पाटील