आमचा सूर्य योग्य ठिकाणी उगवला, सुजय विखेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर

भाजपचे खासदार सुजय विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे (Sujay Vikhe on Ajit Pawar criticism).

आमचा सूर्य योग्य ठिकाणी उगवला, सुजय विखेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर
| Updated on: Mar 11, 2020 | 10:08 PM

अहमदनगर : भाजपचे खासदार सुजय विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे (Sujay Vikhe on Ajit Pawar criticism). जिकडे सूर्य उगवतो विखे तिकडे जातात. त्यांना वाटलं सूर्य तिकडे उगवेल. मात्र. तो इकडेच उगवला, अशी टीका अजित पवारांनी विखे पाटलांवर केली. यावर सुजय विखे यांनी आमचा सूर्य योग्य ठिकाणी उगवल्याचं म्हणत अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं.

सुजय विखे म्हणाले, “वास्तविकपणे भाजपमध्ये अनेक प्रवेश झाले. त्यात सत्ता येणार म्हणून काही प्रवेश झाले, असे काहींचे तर्क असू शकतात. मात्र, आम्ही भाजपमध्ये गेलो, कारण आम्हाला यांनी संधी दिली नाही. हा आमच्या आणि इतरांच्या भाजप प्रवेशात मुलभूत फरक आहे. महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार, केंद्रात नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊन भाजपची सत्ता येणार, 303 जागा येणार हे आम्हाला माहिती नव्हतं. आम्ही त्याकाळात प्रामाणिकपणे काँग्रेसचं काम केलं. काँग्रेस पक्ष जिल्ह्यात वाढवला. यांना जर आम्हाला उगवत्या सुर्याकडे जाऊ द्यायचं नव्हतं, तर त्यांनी आम्हाला लोकसभेचं तिकिट द्यायला हवं होतं. आम्ही भाजपमध्ये नसतो गेलो.”

आम्ही कुणाकडेही पाहून भाजपमध्ये गेलो नाही. आमच्यावर अन्याय झाला, सुडबुद्धीचं राजकारण झालं. त्यानंतर आम्हाला भाजपने आधार दिला. तो आधार आम्ही स्वीकारला. त्यानंतर महाराष्ट्रातील जनतेने भाजप-शिवसेना युतीलाच कौल दिला. त्यामुळे आम्ही घेतलेला निर्णय चुकला असं अजिबात नाही. पण अपवादात्मक आलेली सत्ता आणि त्याच्यावर होणाऱ्या भाषणावर मी टीका नको करायला. मागील काळात कर्नाटक झालं, आता मध्यप्रदेश झालं, आगामी काळात महाराष्ट्रातही सत्तांतरण होईल, असंही सुजय विखे म्हणाले.

Sujay Vikhe on Ajit Pawar criticism