‘शिवसेना भवनातून करिना-कतरिनाला फोन केले जातात, पैसे देऊन ट्विट करायला सांगतात’

| Updated on: May 13, 2021 | 12:53 PM

ही एजन्सी दिशा पटानी, करिना कपूर, कतरिना कैफ, फरहान खान यांच्यासारख्या अनेक कलाकारांच्या संपर्कात आहे. | Nitesh Rane Bollywood

शिवसेना भवनातून करिना-कतरिनाला फोन केले जातात, पैसे देऊन ट्विट करायला सांगतात
नितेश राणे, भाजप आमदार
Follow us on

मुंबई: ठाकरे सरकार कोरोनाची खरी परिस्थिती लपवण्यासाठी आणि आपल्या प्रतिमा संवर्धनासाठी (Image Building) बॉलिवूड कलाकारांकडून ट्विट करवून घेते. त्यासाठी शिवसेना भवनावरून अनेक कलाकारांना फोन केले जातात, असा गंभीर आरोप भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला. (BJP MLA Nitesh Rane slams Thackeray govt over extending Lockdown in Maharashtra till 31st May)

नितेश राणे यांनी गुरुवारी मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना यासंदर्भात भाष्य केले. सरकारी तिजोरीत खडखडाट असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोशल मीडिया अकाऊंटस सांभाळण्यासाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते. तसेच ठाकरे सरकारने आपल्या प्रतिमा संवर्धनासाठी रेन ड्रॉप या एजन्सीला काम दिले आहे. ही एजन्सी दिशा पटानी, करिना कपूर, कतरिना कैफ, फरहान खान यांच्यासारख्या अनेक कलाकारांच्या संपर्कात आहे. तुम्ही करिना कपूर किंवा कतरिना कैफ यांची अलीकडची ट्विटस बघा. या बॉलिवूड सेलिब्रिटींकडून पैसे देऊन ट्विट करवून घेतले जात आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले.

आगामी अधिवेशनात मी हे सर्व पुरावे मांडून सर्वांना उघडं पाडणार आहे. कोणाला आतापर्यंत किती पैसे देण्यात आलेत, किती बिलं झालेत, हे सर्व मला माहिती आहे. छोट्या कलाकारांना ट्विट करण्यासाठी साधारण तीन लाख आणि बड्या कलाकारांना त्यापेक्षाही जास्त रक्कम मिळते. त्यासाठी थेट सेनाभवनातून या बॉलिवूड सेलिब्रिटींना फोन केले जातात, असा आरोप नितेश राणे यांनी केला.

‘मुंबई मॉडेल’ इतकेच यशस्वी असेल तर लॉकडाऊन कशाला वाढवलात?

ठाकरे सरकारकडून गाजावाजा केले जाणारे मुंबई मॉडेल इतकेच यशस्वी असेल तर लॉकडाऊन 31 मे पर्यंत का वाढवण्यात आला, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला. ठाकरे सरकार कोरोनाचे खरे आकडे लपवत आहे. त्यांना राज्यातील परिस्थिती गंभीर असल्याची जाणीव आहे. बेडस आणि ऑक्सिजनचा अजूनही तुटवडा आहे. त्यामुळे ठाकरे सरकारमध्ये लॉकडाऊन हटवण्याची हिंमत नाही.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या खरोखरच कमी झाली असती तर अनलॉक झाले पाहिजे होते. दुकाने आणि इतर व्यवहार सुरु करायला परवानगी दिली पाहिजे होती. पावसाळ्याला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. मग उरलेल्या 15 दिवसांत लोकांना पैसे कमवू द्यायचे होते. मात्र, मुळातच मुंबई मॉडेल फसवे असल्यामुळे ठाकरे सरकारने लॉकडाऊन वाढवल्याचे नितेश राणे यांनी म्हटले.

संबंधित बातम्या:

उधळपट्टी? अजित पवारांचा सोशल मीडिया सांभाळणाऱ्यांना सरकारी तिजोरीतून 6 कोटी!

(BJP MLA Nitesh Rane slams Thackeray govt over extending Lockdown in Maharashtra till 31st May)