
Uddhav Thackeray : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रासह इतरही राज्यांत मतचोरी झाल्याचा धक्कदायक आरोप केला आहे. या आरोपानंतर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे शिवेसना (ठाकरे गट) पक्षानेही हा मुद्दा उचलून धरला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोग आणि सत्ताधारी भाजपाला धारेवर धरलं आहे. त्यांनी मतदान प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून भाजपाच्याच एका नेत्याने ईव्हीएम हॅक करण्याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं होतं असा खळबळजनक दावा केला आहे. उद्धव ठाकरेंच्या या दाव्यानंतर आता हा नेता नेमका कोण होता? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. तसेच आता भाजपाच्या गोटातून ठाकरेंना नेमके कशा पद्धतीने प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर त्यावर खासदार शरद पवार यांनी भाष्य केले होते. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवेळी मला दोन जण भेटायला आले होते. त्यांनी मला 160 जागा जिंकून देऊ असे सांगितले होते. पण मी ते नाकारले, असे खळबळजनक विधान केले होते. पवारांच्या याच दाव्यावर तुमची भूमिका काय? असा प्रश्न यावेळी ठाकरेंना विचारण्यात आला. यावर बोलताना निवडणुका आल्यावर अशी लोकं भेटतात. अशा लोकांना आम्ही गांभीर्याने घेतलं नाही. आम्ही त्यांना थारा दिला नव्हता. आम्हाला अशा पद्धतीने जिंकायचं नव्हतं, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली. पुढे बोलताना त्यांनी भाजपसोबत युती असताना भाजपचे एक नेते आले होते. त्यांनी ईव्हीएम कसं हॅक केलं जातं याचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं. आता ते नेते नाहीत, असा मोठा आणि खळबळजनक दावा केला.
निवडणूक प्रक्रिया आणि मतदार याद्यांतील कथित घोळाप्रकरणी तुम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार का? असाही प्रश्न यावेळी ठाकरेंना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना कोर्टात जाऊन काय करावं. डीलिट झालेली नावे कोर्टाला देणं आम्हाला बंधनकारक नाही असं आयोग म्हणतं. निवडणूक आयोग हे कोर्टाच्या वर आहे का? राष्ट्रपतींच्याही वर निवडणूक आयुक्त आहेत का? असे अनेक सवाल ठाकरेंनी उपस्थित केले.