उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री, ही शरद पवारांची इच्छा?

| Updated on: Nov 11, 2019 | 7:40 PM

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद देण्याची मागणी केली जात आहे, तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना पुन्हा उपमुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री, ही शरद पवारांची इच्छा?
Follow us on

मुंबई : शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं महासेनाआघाडी सरकार जवळपास निश्चित मानलं जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद देण्याची मागणी केली जात आहे, तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना पुन्हा उपमुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता (Uddhav Thackeray for CM) आहे. ‘किंगमेकर’ शरद पवार यांनी दोघांच्या नावाचा आग्रह धरल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रात महासेनाआघाडी सरकार येण्याचं निश्चित झाल्यानंतर शिवसैनिक आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद, तर अजित पवार यांना पुन्हा उपमुख्यमंत्रिपद देण्याची मागणी जोर धरत आहे.

महासेनाआघाडी सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्रिपदं असण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून कोणत्या नेत्याला हे पद मिळणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे या मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या नेत्यांसह प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचीही नावं पुढे येऊ शकतात.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाचा मान काँग्रेसला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या 17 नोव्हेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीला शिवसेनेचा मुख्यमंत्री पदाची शपथ घेईल. शिवतीर्थावर अर्थात शिवाजी पार्कवर हा शपथविधी सोहळा पार पडू शकतो.

सोनिया गांधींचं मन वळवण्यात यश, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेनेला पाठिंब्याची पत्रं

शिवसेनेला राष्ट्रवादीचा पाठिंबा असेल, तर बहुमत सिद्ध करताना काँग्रेस बाहेरुन पाठिंबा देईल, असं म्हटलं जात आहे. त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचं उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना दिलेलं वचन (Uddhav Thackeray for CM) आता पूर्ण होण्याची चिन्हं आहेत.

राष्ट्रवादीचा आतून तर काँग्रेसचा बाहेरुन पाठिंबा
सभागृहाचे संख्याबळ 288 वजा 44 = 244
शिवसेना – अपक्षांच्या पाठिंब्यासह (64) + राष्ट्रवादी (54)+ काँग्रेस समर्थक अपक्ष (04) = 122
बहुमताचे संख्याबळ – 123

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 पक्षीय बलाबल 

  • भाजप – 105
  • शिवसेना – 56
  • राष्ट्रवादी – 54
  • काँग्रेस – 44
  • बहुजन विकास आघाडी – 03 (महाआघाडी)
  • प्रहार जनशक्ती – 02 (शिवसेनेला पाठिंबा)
  • एमआयएम – 02
  • समाजवादी पक्ष – 02 (महाआघाडी)
  • मनसे – 01
  • माकप – 01
  • जनसुराज्य शक्ती – 01 (भाजपला पाठिंबा)
  • क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01 (शिवसेनेला पाठिंबा)
  • शेकाप – 01 (भाजपला पाठिंबा)
  • रासप – 01 (भाजपला पाठिंबा)
  • स्वाभिमानी – 01 (महाआघाडी)
  • अपक्ष – 13 – (8 अपक्ष भाजपसोबत, 5 अपक्ष शिवसेनेसोबत)
  • एकूण – 288

Uddhav Thackeray for CM