काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेनेला पाठिंब्याचं पत्र नाहीच

काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांचं मन वळवण्यात पक्षाच्या महाराष्ट्रातील नेत्यांना यश आल्याची चर्चा होती. मात्र अजून त्याबाबत स्पष्टता नाही.

काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेनेला पाठिंब्याचं पत्र नाहीच

नवी दिल्ली : काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांचं मन वळवण्यात पक्षाच्या महाराष्ट्रातील नेत्यांना यश आल्याची चर्चा होती. मात्र अजून त्याबाबत स्पष्टता नाही. कारण काँग्रेस-राष्ट्रवादीचं शिवसेनेला पाठिंब्याचं पत्र मिळालेलंच नाही. त्यामुळे शिवसेनेची अडचण झाली. शिवसेना नेते आज राजभवनावर जाऊन राज्यपालांकडे मुदतवाढ मागितली, पण राज्यपालांनी नकार दिला.

काँग्रेस शिवसेनेला बाहेरुन पाठिंबा देण्यास राजी झाल्याचं सांगण्यात आलं. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेनेला पाठिंब्याची पत्रं देण्यात आल्याचीही माहिती पुढे आली. त्यामुळे महाराष्ट्रात आता महासेनाआघाडीचं सरकार येणं जवळपास (Congress NCP supports Shivsena) निश्चित मानलं गेलं. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, अशी अटकळ बांधली गेली. पण तूर्तास तरी काँग्रेस-राष्ट्रवादीचं पाठिंब्याचं पत्र शिवसेनेला आणि राज्यपालांना मिळालं नाही. त्यामुळे राज्यपालांनी शिवसेनेला मुदतवाढ दिलेली नाही.

दुसरीकडे शिवसेनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. मात्र राज्यपालांनी मुदतवाढ दिलेली नाही.

राष्ट्रवादीने 54 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र शिवसेनेला फॅक्सद्वारे पाठवल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र त्याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

सोनिया गांधींचं मतपरिवर्तन नाहीच?

महाराष्ट्रातील आमदारांशी चर्चेनंतर सोनिया गांधींचं मत बदलल्याची चर्चा आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्यास सोनिया गांधी तयार नव्हत्या. दिवसभर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी त्यांची समजूत काढली. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, विजय वडेट्टीवार, राजीव सातव अशा नेत्यांनी दिल्ली दरबारी हजेरी लावली. मात्र काँग्रेसचं पाठिंब्याचं पत्र शिवसेनेला मिळालीच नाही.

शिवसेनेला मुख्यमंत्रिपद, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदं?

विरोधी विचारधारेच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्यास इतर राज्यांतील निवडणुकांमध्ये काँग्रेसची अडचण होईल, अशी सोनिया गांधींसह राहुल गांधी, प्रियांका गांधी यांची धारणा आहे. त्यानंतर शरद पवार यांची सोनिया गांधी यांच्याबरोबर फोनवरुन चर्चा झाली. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंनीही फोनवरुन सोनिया गांधींशी संवाद साधला.

राष्ट्रवादीचा आतून तर काँग्रेसचा बाहेरुन पाठिंबा (Congress NCP supports Shivsena) 
सभागृहाचे संख्याबळ 288 वजा 44 = 244
शिवसेना – अपक्षांच्या पाठिंब्यासह (64) + राष्ट्रवादी (54)+ काँग्रेस समर्थक अपक्ष (04) = 122
बहुमताचे संख्याबळ – 123

शिवसेनेला पाठिंबा दिलेले आमदार (08)

 1. आशिष जयस्वाल – रामटेक (नागपूर)
 2. नरेंद्र भोंडेकर – भंडारा (भंडारा)
 3. चंद्रकांत पाटील – मुक्ताईनगर (जळगाव) – (शिवसेना बंडखोर)
 4. मंजुषा गावित – साक्री, धुळे (भाजप बंडखोर)
 5. राजेंद्र पाटील यड्रावकर – शिरोळ, कोल्हापूर (राष्ट्रवादी बंडखोर)
 6. बच्चू कडू – <पक्ष – प्रहार संघटना> – अचलपूर (अमरावती)
 7. राजकुमार पटेल – <पक्ष – प्रहार संघटना> – मेळघाट (अमरावती)
 8. शंकरराव गडाख – <पक्ष – क्रांतिकारी शेतकरी पक्ष> – नेवासा (अहमदनगर)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 पक्षीय बलाबल (Maharashtra Vidhansabha Election Partywise Result)

 • भाजप – 105
 • शिवसेना – 56
 • राष्ट्रवादी – 54
 • काँग्रेस – 44
 • बहुजन विकास आघाडी – 03 (महाआघाडी)
 • प्रहार जनशक्ती – 02 (शिवसेनेला पाठिंबा)
 • एमआयएम – 02
 • समाजवादी पक्ष – 02 (महाआघाडी)
 • मनसे – 01
 • माकप – 01
 • जनसुराज्य शक्ती – 01 (भाजपला पाठिंबा)
 • क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01 (शिवसेनेला पाठिंबा)
 • शेकाप – 01 (भाजपला पाठिंबा)
 • रासप – 01 (भाजपला पाठिंबा)
 • स्वाभिमानी – 01 (महाआघाडी)
 • अपक्ष – 13 – (8 अपक्ष भाजपसोबत, 5 अपक्ष शिवसेनेसोबत)
 • एकूण – 288

(Congress NCP supports Shivsena)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI