Eknath Shinde: ‘असंभव को संभव करणारे अमित शाह..’, एकनाथ शिंदेंची फटकेबाजी, विरोधकांवर तोफ डागली!
केंद्रीय गृहमंत्री मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या भूमीपूजन समारंभातही सहभागी झाले. या कार्यक्रमात बोलताना राज्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्या कामाचे कौतुक करताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

रणजित जाधव, प्रतिनिधी: DCM Eknath Shinde Speech Pune: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर दाखल झाले आहेत. या दौऱ्यामध्ये अमित शाह यांनी पुण्यातील मुंढवा परिसरात असलेल्या भारत फोर्ज लिमिटेडला भेट दिली. तसेच केंद्रीय गृहमंत्री मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या भूमीपूजन समारंभातही सहभागी झाले. या कार्यक्रमात बोलताना राज्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्या कामाचे कौतुक करताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
“तळेगावची भूमी उद्योगांसाठी चेतना देणारी आहे. ही महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे, कंपनी पुन्हा सुरू होत आहे. इथे हजारो तरुणांना नोकरी मिळणार आहे. सहकार क्षेत्र त्यांनी डबघाईला आणली होती, अमित शहा यांनी डिलीट बटन दाबून पुन्हा सुरळीत केली आहे. त्यांनी सहकार क्षेत्र मजबुत केलं आहे. असंभव को संभव करणाऱ्या अमित शहा याना वंदन आहे,” असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांचं कौतुक केले.
विरोधकांवर निशाणा!
“विरोधकांना मोदी- शहा यांच्या नावाचा फोबिया झाला आहे. विरोधकांना मळमळ आणि जळजळ होत आहे. देशातील नक्षलवाद मोदी आणि शहा यांनी संपवला आहे. मागचे भ्रष्टाचारी सरकार होते, म्हणून कारखाने बंद पडले. 2014 नंतर बंद पडलेले कारखाने सुरू झाले आहेत. देशाचे महाराष्ट्र हे ग्रोथ इंजिन आहे. बंद पडलेले कारखाने सुरू होत ही काळाची गरज आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अमित शहा यांचा एक हात पुढे असतो,” असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी यावेळी विरोधकांवर जोरदार टिका केली.
दरम्यान, राज्यासाठी हा प्लांट सुरु होणे राज्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यासाठी मी अमित शाह यांचे आभार मानतो. अशा प्रकल्पासाठी नेहमीच त्यांची साथ असते, ते सहकार मंत्री झाल्यापासुन नवी सुरुवात झाली. त्यांच्या दुरदृष्टीने देशाला आणी सहकार क्षेत्राला नवी दिशा दिली आहे. सहकार क्षेत्रात अमुलाग्र बदल होत आहे, असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.