बीडमध्ये अमित शाहांचं 370 तोफांच्या सलामीनं स्वागत

| Updated on: Oct 08, 2019 | 5:00 PM

बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे दसऱ्या मेळाव्याच्या (Dasara Melava Beed) निमित्ताने मुंडे भगिनींनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं आहे.

बीडमध्ये अमित शाहांचं 370 तोफांच्या सलामीनं स्वागत
Follow us on

बीड: बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे दसऱ्या मेळाव्याच्या (Dasara Melava Beed) निमित्ताने मुंडे भगिनींनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शाह (Amit Shah in Beed) हे देखील यावेळी उपस्थित होते. जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आशिर्वाद देत 300 जागा दिल्या आणि मोदींनी 5 महिन्यात कलम 370 हटवल्याचा (Article 370) मुद्दा यावेळी शाह यांनी नमूद केला.

अमित शाह म्हणाले, “तुम्ही सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आशिर्वाद देत 300 जागा दिल्या. त्यानंतर मोदींनी 5 महिन्यात कलम 370 हटवत संपूर्ण देशाला एक केलं. त्यामुळेच आज मोदींच्या सन्मानात 370 राष्ट्रभक्त राष्ट्रध्वज घेऊन येथे उपस्थित आहेत.”

राज्याच्या महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी देखील यावेळी अमित शाह आणि मोदींचं कौतुक केलं. पंकजा मुंडे म्हणाल्या, “या देशातील सर्वांना एकत्रित आणण्यासाठी राष्ट्रभक्ती हा एकच धागा आहे. राष्ट्रभक्तीतून सर्व रंगांना एकत्रित आणता येतं. अमित शाह यांच्या माध्यमातून कलम 370 हटवण्यात आलं. याकामासाठीच आम्ही त्यांना 370 तोफांची सलामी दिली.” या कार्यक्रमात 370 जणांनी हातात तिरंगे झेंडे घेऊन शाहांचं स्वागत केलं.

सावरगाव घाट येथे आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्यासाठी पंकजा मुंडे यांनी स्वतः औरंगाबाद विमानतळावर अमित शाहांचं स्वागत केलं. सावरगाव येथे झालेल्या मुंडेंच्या या दसरा मेळाव्याकडे अनेकांचं लक्ष लागून होतं. विशेष म्हणजे यावेळी स्वतः अमित शाह उपस्थित राहणार असल्यानं याची अधिक चर्चा झाली. या मेळाव्याचे हे तिसरे वर्ष आहे. या मेळाव्याच्या माध्यामातून पंकजा मुंडेंनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मेळाव्याच्या ठिकाणी 2 स्टेज बनवण्यात आले होते. एका स्टेजवर प्रमुख उपस्थिती आणि दुसऱ्या स्टेजवर बीड जिल्ह्यातील भाजप उमेदवार होते.

गोपीनाथ मुंडे यांनी भगवानगडावर सुरू केलेल्या दसरा मेळाव्याची परंपरा पंकजा मुंडेंनी यांनी पुढे सुरू ठेवली आहे. मात्र, गेल्या 2 वर्षांपूर्वी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी या दसरा मेळाव्याला विरोध केला. त्यामुळे आता हा दसरा मेळावा भगवान बाबांचे जन्मस्थळ असणाऱ्या सावरगावात आयोजित केला जातो.