राष्ट्रवादी कुणाची? सुनावणी सुरू होणार, असे आहे बारा दिवसांचे टाइम टेबल

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता राष्ट्रवादी पक्षाच्या दोन्ही गटांनी पक्षावर दावा केला आहे. यासंदर्भात विधानसभाअध्यक्षांसमोर उद्यापासून सुनावणीला सुरुवात होणार आहे. यासंदर्भात दोन्ही गटांनी वेगवेगळ्या याचिका केल्या आहेत. या सुनावणीचे 12 दिवासांचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी कुणाची? सुनावणी सुरू होणार, असे आहे बारा दिवसांचे टाइम टेबल
ajit pawar and sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 05, 2024 | 12:56 PM

विनायक डावरुंग, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, मुंबई | 5 जानेवारी 2023 : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आता राष्ट्रवादी पक्षावरील दावेदारीसाठी कायदेशीर लढाईला सुरुवात होणार आहे. राष्ट्रवादीच्या अपात्र आमदाराच्या प्रकरणाची ही सुनावणी शिवसेना अपात्र आमदाराच्या सुनावणीच्या धर्तीवर विधानसभा अध्यक्षांसमोर होणार आहे. या प्रकरणात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी वेगवेगळे दावे केले आहेत. राष्ट्रवादीच्या अपात्रता याचिकेवरील सुनावणीसाठी 12 दिवसांचे वेळापत्रक तयार केले आहे. त्यानुसार विधानसभा अध्यक्षांसमोर ही सुनावणी होणार आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. अजित पवार गट सत्तेत सामील झाल्याने राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. सत्तेत सामील झाल्यानंतर अजित पवार गटाने खरी राष्ट्रवादी आपलीच असून राष्ट्रवादी पक्षावर आणि घड्याळ चिन्हावर दावा केला आहे. अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्षांवर दावा केल्याने शरद पवार गट देखील प्रचंड आक्रमक झाला आहे.

असे असेल कामकाजाचे वेळापत्रक :

6 जानेवारी – राष्ट्रवादीचे दोन्ही गटांमध्ये याचिका आणि त्यावरील उत्तराची कागदपत्रे एकमेकांना सोपविली जातील.

8  जानेवारी – याचिकेसाठी अधिकची, अतिरिक्त माहिती जोडण्यासाठी वेळ.

9 जानेवारी – फाईल्स किंवा अधिकची, अतिरिक्त कागदपत्रे पटलावर आणणे. मात्र, 9 तारखेनंतर ऎनवेळी कोणतीही नवी कागदपत्रे जोडता येणार नाही. अशा मागणीचा विचार केला जाणार नसल्याचे स्पष्टपणे बजावण्यात आले आहे.

11  जानेवारी – याचिकेशी संबंधित कागदपत्रांची पाहणी आणि पडताळणी. पहिल्या दिवशी शरद पवार गट अजित पवार गटाकडून सादर झालेली कागदपत्रे तपासेल.

12 जानेवारी – याचिकेशी संबंधित कागदपत्रांची पाहणी आणि पडताळणीचा दुसरा दिवस. अजित पवार गटाकडून शरद पवार गटाने सादर केलेल्या कागदपत्रांची पाहणी केली जाईल.

14 जानेवारी – सुनावणीच्या कामकाजात कागदपत्रांचा समावेश करण्यासाठी किंवा एखादे वगळण्यासाठी अर्ज दाखल करण्याचा दिवस.

16  जानेवारी – विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांसमोर पहिली प्रत्यक्ष सुनावणी. सुनावणीचे विषय नक्की केले जातील.

18  जानेवारी – प्रतिज्ञापत्र सादर करणे.

20 जानेवारी – अजित पवार गटाच्या साक्षीदारांच्या उलटतपासणी

23 जानेवारी – शरद पवार गटाच्या साक्षीदारांच्या उलटतपासणी

25 आणि 27 जानेवारी – राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे अंतिम युक्तीवाद.