या दिग्गज नेत्यांना मोदींच्या कॅबिनेटमध्ये स्थान का नाही?

| Updated on: Jun 03, 2019 | 9:45 PM

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत 57 मंत्र्यांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. यापूर्वीच्या सरकारमध्ये 27 कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांसह एकूण 75 मंत्र्यांचा समावेश होता. यावेळी मंत्र्यांची संख्या कमी करण्यात आलेली असली तरी अनेक दिग्गज नेत्यांची नावं वगळण्यात आली आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचं आणि आश्चर्यचकित करणारं नाव म्हणजे सुषमा स्वराज. परराष्ट्र […]

या दिग्गज नेत्यांना मोदींच्या कॅबिनेटमध्ये स्थान का नाही?
Follow us on

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत 57 मंत्र्यांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. यापूर्वीच्या सरकारमध्ये 27 कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांसह एकूण 75 मंत्र्यांचा समावेश होता. यावेळी मंत्र्यांची संख्या कमी करण्यात आलेली असली तरी अनेक दिग्गज नेत्यांची नावं वगळण्यात आली आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचं आणि आश्चर्यचकित करणारं नाव म्हणजे सुषमा स्वराज. परराष्ट्र मंत्रालयाला वेगळी ओळख मिळवून देणाऱ्या सुषमा स्वराज यांनाही स्थान न मिळाल्याने अनेक चर्चांना उधाण आलं.

सुषमा स्वराज यांना संधी का नाही?

भाजपचे वरिष्ठ नेते अरुण जेटली यांनी प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देत स्वतःच मंत्रिपद नको, असं सांगितलं होतं. पण सुषमा स्वराज यांनी तसं काहीही कळवलं नव्हतं. दरम्यान, प्रकृती अस्वास्थ्यामुळे लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचं त्यांनी काही महिन्यांपूर्वीच जाहीर केलं होतं. पण त्यांच्यासाठी राज्यसभेचा मार्ग मोकळा होता.

‘द टेलिग्राफ’ला एका भाजप नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, सुषमा स्वराज यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळेच वगळण्यात आलंय. त्यांच्या जागी माजी परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांना संधी देण्यात आल्याचं या भाजप नेत्याने सांगितलं. पण पक्षातील काही नेत्यांच्या माहितीनुसार, एस जयशंकर यांना राज्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती, ज्याला त्यांनी नकार दिला. यानंतर जयशंकर यांना कॅबिनेट दर्जा देण्यात आला, ज्यामुळे सुषमा स्वराज यांच्या मंत्रिमंडळातील एक्झिटवर शिक्कामोर्तब झालं, असं ‘द टेलिग्राफ’च्या वृत्तात म्हटलंय.

मनेका गांधींनाही संधी नाही

गांधी कुटुंबाच्या सदस्य असलेल्या आणि सुषमा स्वराज यांच्याप्रमाणेच चांगली कामगिरी करणाऱ्या मनेका गांधी यांनाही संधी मिळाली नाही. लोकसभा अध्यक्षपदासाठी मनेका गांधी यांचं नाव चर्चेत आहे. पण पक्षातील काही नेत्यांच्या मते, पक्षातील नेत्यांशी मनेका गांधी आणि त्यांचे चिरंजीव वरुण गांधी यांचे संबंध फार सौम्य नसल्यामुळे नाव वगळलं गेलं असावं, असा अंदाज आहे.

एका भाजप नेत्याच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात ज्यांनी पक्षासाठी जास्त मेहनत घेतली, त्यांना मेहनतीची पावती देण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं. पक्षाध्यक्ष अमित शाह यांनीच काही महत्त्वाच्या राज्यातील नेत्यांची नावं निश्चित केली, असंही सांगितलं जातंय.

राज्यवर्धन सिंह राठोड

माडी क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांना संधी न देणंही अनेकांना पटलं नाही. ऑलिम्पिक खेळाडू आणि माजी सैन्य अधिकारी असलेल्या राज्यवर्धन सिंह यांच्या मंत्रालयाची कामगिरी चांगली सांगितली जाते. पण त्यांना राजस्थानमध्ये पक्षाच्या कामासाठी मंत्रिमंडळातून बाहेर ठेवल्याचं बोललं जातंय. राजस्थानमध्ये भाजपने 25 पैकी 24 जागा जिंकल्या आहेत. पण राज्यवर्धन सिंह यांची पक्षाला जास्त गरज असल्याचं काही नेत्यांचं म्हणणं आहे.

जयंत सिन्हा

मंत्र्यांचा शपथविधी होण्यापूर्वी व्यासपीठावर जयंत सिन्हा दिसले नाही तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. माजी अर्थ राज्यमंत्री असलेले जयंत सिन्हा यांच्याकडे नागरी उड्डाण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. पण त्यांना वगळण्यामागचं कारण कुणीही समजू शकलं नाही. त्यांचे वडील यशवंत सिन्हा यांनी भाजपविरोधात जो मोर्चा उघडला होता, त्यामुळेच जयंत सिन्हा यांनाही बाहेर ठेवल्याचं बोललं जातंय. भाजप नेत्यांच्या मते, खराब कामगिरीमुळे अनेकांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. या श्रेणीतील नेत्यांमध्ये राधामोहन सिंग, सुरेश प्रभू, महेश शर्मा, सत्यपाल सिंग, अनंत हेगडे, विजय गोयल आणि ज्युअल ओरम यांचं नाव सांगण्यात आलंय.