नीरा-देवघरच्या पाण्यासाठी बारामतीकर आक्रमक

बारामतीकरांनी नीरा-देवघर धरणाचं पाणी वळवण्याच्या निर्णयाविरोधात संताप व्यक्त करत आता संघर्षाचा पवित्रा घेतला आहे. शासनानं समन्यायी पद्धतीनं पाणी वाटप करावं, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

नीरा-देवघरच्या पाण्यासाठी बारामतीकर आक्रमक

पुणे: बारामतीकरांनी नीरा-देवघर धरणाचं पाणी वळवण्याच्या निर्णयाविरोधात संताप व्यक्त करत आता संघर्षाचा पवित्रा घेतला आहे. शासनानं समन्यायी पद्धतीनं पाणी वाटप करावं, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. तसेच या मागणीसाठी 20 जूनपासून आंदोलनाला सुरुवात करण्याचा निर्णयही आजच्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला.

शासनाकडून पाण्याबद्दल दुजाभाव केला जात असल्याचीही भावना व्यक्त केली जात आहे. आता राजकीय जोडे बाजूला ठेवून लढा देण्याचा निर्धार या बैठकीत घेण्यात आला. नीरा-देवघर धरणाच्या डाव्या कालव्यातील पाणी वळवल्याने बारामती, इंदापूर आणि पुरंदर तालुक्यातील शेतीवर परिणाम होईल, असाही  अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभुमीवर आज बारामतीतील निरा कॅनॉल खरेदी विक्री संघात सर्वपक्षीय बैठक पार पडली.

काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह भाजप-सेनेच्या पदाधिकार्‍यांनीही या बैठकीत हजेरी लावली. या बैठकीत उपस्थित शेतकर्‍यांनी सरकारच्या धोरणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत योग्य निर्णय घेण्याची आग्रही मागणी केली. 20 जून रोजी प्रांताधिकारी आणि तहसिलदारांना निवेदन देऊन आंदोलनाला सुरुवात करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आल्याची माहिती सतीश काकडे यांनी दिली.

शासनानं नीरा देवघर धरणाच्या पाण्याबाबत राजकीय आकसातून निर्णय घेतला. त्यामुळं सर्वसामान्य शेतकर्‍यांमध्ये संताप असून या निर्णयाविरोधात बारामतीत चक्री उपोषण केलं जाणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण यांनी ही माहिती दिली. गेल्या काही दिवसात नीरा देवघरच्या पाण्यावरुन संघर्ष सुरु आहे. एकीकडे नीरा देवघरच्या कालव्यांची कामे अपूर्ण असताना अतिरिक्त पाणी कुणाला द्यायचं हा प्रश्न आहे. असं असताना माढा आणि बारामतीत पाण्याचा संघर्ष सुरु आहे. त्यातूनच आता बारामतीकरांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळं आता शासन नीरा देवघरच्या पाण्याबाबत काय निर्णय घेणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *