
मुंबई : धनत्रयोदशीच्या काळात लोक घरासाठी वस्तू खरेदी करतात. इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून वाहने, भांडी, सोन्या-चांदीच्या दागिन्यांपर्यंतच्या वस्तू खरेदी करतात. मात्र यंदा दिवाळीपूर्वीच (Diwali Shopping) खरेदीसाठी अत्यंत शुभ मुहूर्त ठरत आहे. या शुभ काळात वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि ज्योतिषी पराग कुळकर्णी यांच्या मते या शुभ काळात वस्तू खरेदी केल्यास देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद होतो. वास्तविक, दिवाळीच्या आधी दोन दिवस पुष्य नक्षत्राचा महासंयोग होत असतो. शनिवार 4 नोव्हेंबर आणि रविवार 5 नोव्हेंबरला पुष्य नक्षत्र असेल. शुक्रवारी रात्री उशिरापासून ते सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र शनिवारी सकाळी 7.57 वाजल्यापासून सुरू होणार असून रविवारी सकाळी 10.30 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
जोतिषी पराग कुळकर्णी यांनी दिलेल्या माहिती नुसार ज्योतिषशास्त्रानुसार 27 नक्षत्रांमध्ये पुष्य नक्षत्राला राजा मानले जाते. शनिवारी पूर्ण दिवस असल्याने या वेळी खूप शुभ आहे. याशिवाय या नक्षत्रावर रविवारचा शुभ संयोगही बनतो. हे नक्षत्र प्रत्येक वर्गासाठी लाभदायक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वार्थ सिद्धी योगाने रविवारी व्यावसायिक नवीन व्यवसाय सुरू करू शकतात.
जर तुम्हाला नवीन दुकान खरेदी करायचे असेल तर या दिवशी खरेदी करणे योग्य ठरेल, नवीन प्रकल्पाशी संबंधित काम सुरू करू शकता. तरुणांना मोबाईल, लॅपटॉप, स्मार्ट घड्याळ, मशीन, वाहन इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करता येतात. सोन्या-चांदीचे दागिने, नाणी, भांडी, मूर्ती खरेदी करणे स्त्रियांसाठी शुभ राहील. मालमत्ता, इमारत, जमीन गुंतवणूक योजना, पॉलिसी इत्यादींमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक लोकांनी FD मध्ये पैसे गुंतवावे, ते खूप फलदायी ठरेल.
मेष राशीचे लोकं पुष्य नक्षत्रावर इमारती, जमीन, उपकरणे आणि गुंतवणूक खरेदी करू शकतात. वृषभ राशीचे लोकं चांदीच्या मूर्ती, दागिने, धान्य खरेदी करू शकतात. मिथुन राशीचे लोकं नवीन व्यवसाय, खाद्यपदार्थ आणि त्यांच्याशी संबंधित काम सुरू करू शकतात. कर्क राशीचे लोकं डेअरी, कापूस इत्यादी पांढर्या वस्तूंचा व्यवसाय करू शकतात. सिंह राशीचे लोकं सोने, चांदीचे दागिने आणि धातूपासून बनवलेली भांडी खरेदी करू शकतात.
कन्या राशीचे लोकं वैद्यकीय उपकरणे इत्यादींमध्ये गुंतवणूक करू शकतात आणि खाद्यपदार्थांचा पुरवठा करू शकतात. तूळ राशीचे लोकं इमारती, जमिनीसह हार्डवेअरशी संबंधित वस्तूंमध्ये गुंतवणूक करू शकतात. वृश्चिक राशीचे लोकं इमारती, जमीन, सोने, चांदी आणि धातू इत्यादींमध्ये गुंतवणूक करू शकतात. धनु राशीचे लोक सोने, चांदी, कपडे, धान्य, तेलबिया यांमध्ये गुंतवणूक करू शकतात, ते त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल. मकर राशीचे लोक वाहन, यंत्रसामग्री, जमीन यामध्ये गुंतवणूक करू शकतात. कुंभ राशीच्या लोकांनी पशुखाद्य, कापूस, तेलबिया इत्यादी खरेदी केली तर मीन राशीच्या लोकांनी तांदूळ, ज्वारी, मका, बाजरी यांमध्ये गुंतवणूक केली तर ते त्यांच्यासाठी खूप शुभ राहील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)