गणपती विसर्जनानंतर चुकूनही करू नका ‘या’ चुका, जाणून घ्या काय करावे, काय टाळावे
आज गणपती विसर्जन केल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. गणेश विसर्जनानंतर कोणत्या चुका टाळाव्या हे जाणून घ्या.

आज अनंत चतुर्दशी म्हणजेच १० दिवस गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर अखेर त्यांना निरोप देण्याची वेळ आली. गणेश विसर्जनाचा दिवस भक्तांसाठी भावनिक असतो. बाप्पाला निरोप दिल्यानंतरही काही धार्मिक परंपरा आणि मान्यता पाळल्या जातात. विसर्जन करून घरी परतल्यानंतर लगेच काही गोष्टी करू नयेत, असे धार्मिक मान्यतेनुसार सांगितले जाते. तसेच बाप्पाच्या विसर्जनानंतर घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्यालाही महत्त्व दिले जाते. गणेश विसर्जन करून घरी परतल्यानंतर काय करावे आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे जाणून घ्या.
लगेच घराची साफसफाई करू नका गणपती विसर्जन करून घरी परतल्यानंतर लगेच घराची साफसफाई सुरू करू नये, अशी धार्मिक मान्यता आहे. पूजा घरातील वस्तू तातडीने हटवणे, झाडू- पोछा करणे किंवा संपूर्ण घर आवरणे काही काळ टाळावे, असे सांगितले जाते. शक्य असल्यास विसर्जनानंतरची घराची साफसफाई दुसऱ्या दिवशी करावी.
घरात अंधार ठेवू नका बाप्पाला निरोप दिल्यानंतर घरात उदास वातावरण ठेवू नये, असे मानले जाते. विसर्जन म्हणजे बाप्पा घरातून निघून गेले आणि आनंदही संपला, असा त्याचा अर्थ नसतो. उलट गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या अडचणी दूर करून सुख-समृद्धी घेऊन येतात, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे घरी परतल्यानंतर घरातील लाईट बंद करून अंधार ठेवू नये. शक्य असल्यास देवघरातील लाइट रात्रभर सुरू ठेवा.
बाप्पाची क्षमा मागा विसर्जनानंतर गणपती बाप्पाचे स्मरण करून पूजा करताना काही चूक झाली असल्यास त्याबद्दल मनोमन क्षमा मागावी. पुढील वर्षी पुन्हा लवकर घरी येण्याची प्रार्थना करावी. श्रद्धेने आणि सकारात्मक मनाने बाप्पाला निरोप देणे महत्त्वाचे मानले जाते.
विसर्जनाच्या वेळी वारंवार मागे वळून पाहू नका गणपतीची मूर्ती विसर्जनासाठी घेऊन जाताना किंवा विसर्जन झाल्यानंतर परतताना वारंवार मागे वळून पाहू नये, अशी धार्मिक परंपरा आहे. भावनेच्या भरात बाप्पाकडे पुन्हा पुन्हा पाहण्याऐवजी त्यांना श्रद्धेने आणि आनंदाने निरोप द्यावा, असे मानले जाते.
घरी परतल्यानंतर दिवा आणि धूप लावा विसर्जनानंतर घरी परतल्यावर देवघरात दिवा आणि उदबत्ती, धूप लावावे. मात्र घरी पोहोचताच लगेच हात-पाय धुण्याऐवजी काही वेळ थांबून ते करावे, अशी या परंपरेत मान्यता आहे. यानंतर घरातील वातावरण प्रसन्न आणि सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा.
प्रसाद वाटा आणि मन प्रसन्न ठेवा गणेश विसर्जनानंतर प्रसाद इतरांना वाटा आणि स्वतःही प्रसाद घ्या, असे सांगितले जाते. बाप्पाला निरोप देताना मनात दुःख किंवा नकारात्मक भावना ठेवू नये. गणपती आपल्या भक्तांच्या अडचणी दूर करून घरात आनंद आणि सुख-शांती आणतात, अशी श्रद्धा असल्याने बाप्पाला आनंदाने निरोप देण्याची परंपरा आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
